मांडवा येथे सॅनिटायझर फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:40 AM2021-05-10T04:40:35+5:302021-05-10T04:40:35+5:30
गेल्या काही दिवसांपासून भर जहागीर परिसरातील गावांमध्ये कोरोनाचे असंख्य रुग्ण आढळले आहेत. त्यास मांडवा ग्रामपंचायतीअंतर्गत येणारी गावेही अपवाद राहिलेली ...
गेल्या काही दिवसांपासून भर जहागीर परिसरातील गावांमध्ये कोरोनाचे असंख्य रुग्ण आढळले आहेत. त्यास मांडवा ग्रामपंचायतीअंतर्गत येणारी गावेही अपवाद राहिलेली नाहीत. दरम्यान, रोजगारानिमित्त पुणे, मुंबई, औरंगाबाद यासारख्या महानगरांमध्ये गेलेले अनेकजण कोरोनाच्या भीतीने मागील काही दिवसांमध्ये आपापल्या गावी परतले आहेत. त्यांच्यापैकी कोणाला कोरोनाची बाधा झालेली असल्यास त्यांच्यापासून इतरांना धोका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मांडवा ग्रामपंचायतीने पुढाकार घेत संपूर्ण गावात सॅनिटायझरची फवारणी करून गाव निर्जंतुक केले. यावेळी ग्रामपंचायत सचिवांसह प्रभारी सरपंच भाऊराव चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य भिका राठोड, प्रकाश जाधव, नंदाबाई चव्हाण, आशाबाई दामोदर गरकळ, रंजना गजानन गरकळ, अनिता चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी गफ्फार शहा व गावातील ग्रामस्थांची उपस्थिती होती.
....................................
बाॅक्स :
गावकऱ्यांनी स्वच्छता राखण्याचे आवाहन
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाचा हिमतीने सामना करणे आवश्यक आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे. विशेषत: स्वत:चे घर व सभोवतालचा परिसर नियमित स्वच्छ ठेवावा. कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसून आल्यास अथवा कुठलाही त्रास होत असल्यास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी. कोरोना चाचणी करण्याची गरज असल्यास त्यास विलंब करू नये. चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यास गृह विलगीकरण अथवा रुग्णालयात दाखल होऊन उपचार घ्यावे, असे आवाहन मांडवा ग्रामपंचायतीकडून करण्यात आले.