संत भायजी महाराज यात्रा उत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:37 AM2021-04-14T04:37:44+5:302021-04-14T04:37:44+5:30
तीर्थक्षेत्र पिंपळखुंटा संगम येथील श्री संत भायजी महाराज यांनी १२९ वर्षांपूर्वी अडाण-मडाण नद्यांच्या संगमावर श्रीराम नवमीनिमित्त यात्रा उत्सव सुरू ...
तीर्थक्षेत्र पिंपळखुंटा संगम येथील श्री संत भायजी महाराज यांनी १२९ वर्षांपूर्वी अडाण-मडाण नद्यांच्या संगमावर श्रीराम नवमीनिमित्त यात्रा उत्सव सुरू केला. दरवर्षी गुढीपाडवा ते हनुमान जयंतीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या यात्रा महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यामध्ये गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून रामनवमीपर्यंत 'राम कृष्ण विठ्ठल हरी नारायण' नामाचा अखंड जयघोष करण्यात येत असतो. रामनवमीच्या दिवशी काकड आरती, शोभायात्रा मिरवणूक, मूर्ती व समाधी पूजन, श्रीराम जन्म कथा प्रवचन, श्रीराम, लक्ष्मण व सीता मूर्ती पूजन, गोविंद महाराज प्रदक्षिणा, दहीहांडी व दुपारी ४ वाजता पासून भव्य महाप्रसादाचे वितरण करण्यात येते. मात्र, यावर्षी कोरोनाची स्थिती गतवर्षी पेक्षाही बिकट झाली आहे. त्यामुळे शासनाच्या निर्देशाप्रमाणे यावर्षी गुढीपाडवा ते हनुमान जयंतीपर्यंत साजरे होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील भाविकांनी यावर्षी श्रीराम जन्मोत्सव आपल्या घरीच साजरा करावा असे आवाहन संत भायजी महाराज संस्थान व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.