संत सेवालाल महाराज जन्मोत्सव : पोहरादेवीत शेकडो भाविक नतमस्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 07:07 PM2021-02-15T19:07:16+5:302021-02-15T19:07:31+5:30
Sant Sewalal Maharaj Janmotsav: भाविकांनी संत सेवालाल महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत महाप्रसादाचा लाभ घेतला.
मानोरा : बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव १५ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. विविध ठिकाणांवरून आलेल्या शेकडो भाविकांनी संत सेवालाल महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत महाप्रसादाचा लाभ घेतला.
संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे ८ फेब्रुवारीपासून जन्मोत्सव सोहळा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. १५ फेब्रुवारीला जन्मोत्सव सोहळा निमित्त गावातून पहाटेच्या सुमारास पालखी सोहळा काढून नगरप्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी रस्त्यावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली. ठिकठिकाणी चहा, नाश्ता, पाणी तर वसंतनगर येथील काही भाविकातर्फे ाप्रसाद वाटप करण्यात आले. पालखी सोहळा सात तास चालला असून, त्यानंतर पालखी मंदिरात पोहोचली. यावेळी राजुदास महाराज यांनी पाळणा गीत सादर केले. संस्थानचे अध्यक्ष महंत कबिरदास महाराज यांनी बापूची आरती म्हटल्यावर भोग (भंडारा) अर्पण करून आरदास करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती समितीचे विलास राठोड, प्रकाश राठोड, प्रा. जगदीश राठोड, कुंडलिक राठोड, उल्हास महाराज, खुशाल महाराज यांच्यासह मान्यवरांनी परिश्रम घेतले.
राष्ट्रसंत डॉ रामरावबापू महाराज आश्रमात जन्मोत्सव
राष्ट्रसंत डॉ रामरावबापू महाराज आश्रमात जगतगुरू संत सेवालाल महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बापूचे उत्तराधिकारी महंत बाबूसिंग महाराज यांनी पूजा विधी भोगभंडारा अर्पण करून आरदास म्हटले. यावेळी आश्रमतर्फे प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी महंत संजय महाराज, बलदेव महाराज, इंजि. रमेश पवार, भोला राठोड, शेषराव जाधव, जे .जे. राठोड, टी. आर. राठोड ,राहुल महाराज, गदर महाराज, धीरज महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. भक्तीधाम येथे विविध कार्यक्रम करण्यात आले. संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून भोग लावण्यात आला. महंत जितेंद्र महाराज यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.
दिग्रस व मानोरा आॅटो प्रवास मोफत
दिग्रस व मानोरा येथुन श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे येणाºया भाविकांसाठी गावातील ४५ आॅटोधारकांनी एक दिवस कोणतेही प्रवासी भाडे न आकारता मोफत सेवा दिली. यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले.