शिरपूरच्या सरपंच निवडीची सभा तहकूब!
By admin | Published: February 28, 2017 01:38 AM2017-02-28T01:38:34+5:302017-02-28T01:38:34+5:30
अंभोरे यांनी भरला वेळेत अर्ज; खोरणे पोहोचल्या वेळेनंतर!
शिरपूर जैन(वाशिम), दि. २७- येथील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी २७ फेब्रुवारीला बोलाविलेली सभा गणपूर्तीअभावी तहकूब करण्यात आली. तहकूब सभा २८ फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे. दरम्यान, सुनीता अंभोरे यांनी सरपंच पदासाठी वेळेपूर्वी अर्ज भरला, तर दुसर्या गटाकडून शोभा खोरणे या अर्ज भरण्यासाठी वेळेत पोहोचू शकल्या नाहीत.
शिरपूर ग्रामपंचायतमध्ये १७ सदस्य असून, नऊ सदस्य डॉ. श्याम गाभणे व संजय शर्मा गटाचे आहेत, तर आठ सदस्य क्रांती पॅनल व तिसर्या आघाडीचे आहेत. या ग्रामपंचायतीवर गाभणे-शर्मा गटाच्या इंदूताई ईरतकर या सरपंचपदी विराजमान होत्या. ठरल्याप्रमाणे मागील महिन्यात इंदूताई ईरतकर यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे २७ फेब्रुवारी रोजी सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सभा बोलाविण्यात आली होती. सरपंच पदासाठी विरोधी गटातर्फे सुनीता अंभोरे यांनी वेळेच्या आत अर्ज भरला, तर दुसर्या सत्ताधारी गटाकडून अर्ज भरण्यासाठी शोभा खोरणे या ठरावीक वेळेच्या आत पोहोचू शकल्या नाहीत. सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने अंभोरे यांची निवड होईल, असे समजले जात होते. मात्र, गणपूर्ती (कोरम) होत नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर नागपूरकर यांनी सभा तहकूब करून २८ फेब्रुवारी रोजी सभा घेण्याचा निर्णय जाहीर केला. निवडणुकीदरम्यान कुठलाही वाद निर्माण होऊ नये म्हणून शिरपूरचे पोलीस निरीक्षक हरीश गवळी यांनी मालेगावचे पोलीस निरीक्षक नाईकनवरे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, आर.सी.पी.पी. १५ पोलीस, असा तगडा बंदोबस्त ठेवला. तहकूब झालेली सभा २८ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे.