सत्यसाई समितीकडून मालेगाववासियांना मोफत पाणी पुरवठा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 03:35 PM2018-05-25T15:35:53+5:302018-05-25T15:35:53+5:30
मालेगाव: शहरात उद्भवलेली भीषण पाणीटंचाई लक्षात घेता, श्री सत्यसाई सेवा समिती मालेगावच्यावतीने नागरिकांना १२ हजार लीटर क्षमतेच्या टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा सुरू केला आहे.
मालेगाव: शहरात उद्भवलेली भीषण पाणीटंचाई लक्षात घेता, श्री सत्यसाई सेवा समिती मालेगावच्यावतीने नागरिकांना १२ हजार लीटर क्षमतेच्या टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे शहरातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
सध्या मालेगाव शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे कुरळा धरण आटल्यानंतर नगर पंचायतने प्रभाग निहाय तीन टँकर सुरु केले. त्याशिवाय मध्यंतरी काटेपूर्णा ते कुरळा या तात्पुरत्या योजनेसाठी १.३५ कोटी रुपये खर्चून जलवाहिनीही टाकली; परंतु ते नियोजन चुकल्याने शहरवासियांची तहान भागविण्याचा मोठा बिकट प्रश्न नगर पंचायतपुढे उभा झाला होता. जलवाहिनी जीर्ण झाल्याने ही योजना फसल्यानंतर नगर पंचायतकडून शहरात टँकरने पाणी पुरविणे सुरू केले; परंतु नागरिकांची तहान भागविणे त्यानेही शक्य झाले नाही. नागरिकांची तहान भागविण्यासाठी शहरातील समाजसेवक, तसेच लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला असताना आता सत्यसाई सेवा समिती मालेगावच्यावतीने १२ हजार लीटर क्षमतेचे टँंकर सुरु करुन गरीब जनतेची तहान भागविण्याचा स्तुत्य उपक्रम चालु केला आहे. याचा अनेक लोकांना लाभ होत आहे. सत्य साई सेवा समितीने यापूर्वी तालुक्यातील वाकळवाडी येथेही सतत दोन महिने ग्रामस्थांना मोफत पाणी पुरवठा केला. सद्यस्थितीत त्यांच्यावतीने मालेगाव शहरात प्रभाग निहाय दोन टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी महेन्द्र ऊंबरकर, डॉ राजाभाऊ घुगे, सोपान बुढाळकर, राजेश पवार, विनोद कल्याणकर हे परीश्रम घेत आहेत.