शाळा वाचवा, शिक्षण वाचवा! शाळांच्या कंत्राटीकरणास विरोध, आंदोलनासाठी विद्यार्थीही सरसावले
By संतोष वानखडे | Published: September 25, 2023 07:09 PM2023-09-25T19:09:10+5:302023-09-25T19:10:21+5:30
शाळा वाचविण्याच्या आंदोलनाची पूर्वतयारी व जनजागृती म्हणून सोमवारी (दि.२५) विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे ग्रामीण भागात दिसून आले.
वाशिम : राज्यातील सर्व सरकारी शाळांच्या कंत्राटीकरणाचा तसेच सरकारी नोकरभरती खाजगी संस्थांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी सामाजिक संघटनांसह विद्यार्थीदेखील सरसावले आहेत. शाळा वाचविण्याच्या आंदोलनाची पूर्वतयारी व जनजागृती म्हणून सोमवारी (दि.२५) विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे ग्रामीण भागात दिसून आले.
सरकारी शाळा कंत्राटी पद्धतीने उद्योगपतींना चालविण्यास देणार असल्याचा शासन निर्णय नुकताच शासनाने काढला आहे. तसेच सरकारी नोकर भरती ही खाजगी संस्थांच्या माध्यमातून करण्याबाबतचा अध्यादेश महाराष्ट्र शासनाने काढला आहे. हे दोन्हीही निर्णय पुरोगामी महाराष्ट्राला खाईत लोटणारे आहेत, असा आरोप समनक जनता पार्टी व शाळा बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केला. उपरोक्त निर्णय हे शिक्षण हक्क कायद्याला पायदळी तुडविणारे असून, आरक्षण संपविणारे आहेत. त्यामुळे हे निर्णय तात्काळ रद्द करावेत आणि पूर्वीप्रमाणेच सरकारी नोकरभरती करावी, शिक्षणाचे राष्ट्रीयिकरण करावे तसेच यूपीएससी परीक्षा न घेता हुकूमशाही पद्धतीने केलेल्या आयएएस दर्जाच्या नियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात, अशी मागणीही शाळा बचाव समितीसह सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांनी केली.
.. तर गरीबाच्या मुलांनी शिकावे कसे?
वस्ती, पाड्यावरील तसेच गावातील २० पटसंख्येच्या खालील शाळा बंद झाल्या तर गोरगरीबांच्या मुलांनी शिकावे कसे? असा प्रश्नही शाळा बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. सरकारी शाळा वाचविण्याच्या या चळवळीत चिमुकलेदेखील सहभागी होत असल्याचे सोमवारी (दि.२५) दिसून आले.
आज रास्ता रोको आंदोलनाची हाक
सरकारी शाळांच्या कंत्राटीकरणाचा तसेच सरकारी नोकरभरती खाजगी संस्थांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी वाशिम येथील वसंतराव नाईक चौक येथे शाळा बचाव समिती, समनक जनता पार्टी व शिक्षणप्रेमींच्यावतीने रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे.