वाशिम जिल्ह्यात सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवास प्रारंभ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 04:08 PM2018-01-03T16:08:42+5:302018-01-03T16:11:45+5:30
वाशिम : मराठा सेवा संघाच्या वतीने बुधवार, ३ जानेवारीपासून सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवास प्रारंभ झाला असून याअंतर्गत १२ जानेवारीपर्यंत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वाशिम : मराठा सेवा संघाच्या वतीने बुधवार, ३ जानेवारीपासून सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवास प्रारंभ झाला असून याअंतर्गत १२ जानेवारीपर्यंत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे कार्यक्रम याच महोत्सवापासून सुरू होत असून वाशिम व अकोला जिल्ह्यात ३ जानेवारी ते १२ जानेवारी हा कालावधी सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवाच्या नावाने मराठा सेवा संघ व विविध कक्षांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा होत आहे. वाशिम जिल्ह्यात ३ जानेवारीपासून जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिल्ह्यात गाव तेथे शाखा उद्घटन या अभियानास प्रारंभ झाला असून विविध ठिकाणी संवाद बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी जिल्हाध्यक्ष संजीवनी बाजड यांच्या मार्गदर्शनात सर्व पदाधिकारी काम करतील. ६ जानेवारीला मराठा सेवा संघाच्या वतीने विविध शाळा महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ७ जानेवारीला पिंपळगाव डाक बंगला येथे डॉ. डिगांबर निरगुडे हे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करतील. ८ जानेवारी रोजी शाळा परिसर सफाई, ग्रामसफाई तसेच ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात येणार असून मुख्य कार्यक्रम उमरा शमशोद्दीन येथे संजय पडोळे, उत्तमराव आहेर व योगेश खोडके राबवतील. ९ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या वतीने जिल्हाध्यक्ष हभप श्रीकृष्ण पाटील, सचिव हभप निवृत्ती महाराज भालेराव, कार्याध्यक्ष हभप वामन महाराज महाले यांच्यावतीने जांभरुण महाली येथे उपक्रम राबवण्यात येणार असून यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, ग्रामस्वच्छता व संत तसेच महापुरुषांच्या विचारांचा जागर या विषयावर उद्बोधन होणार आहे, असे मराठा सेवा संघाने कळविले.