लैंगिक अत्याचारग्रस्त महिलांना सव्वा कोटींचे अर्थसहाय्य

By admin | Published: August 26, 2015 01:38 AM2015-08-26T01:38:16+5:302015-08-26T01:38:16+5:30

मनोधैर्यचा आधार ; तीन अल्पवयीन मुलींचे समुपदेशनाद्वारे पुनर्वसन.

Savvy crores subsidy for women affected by sexual harassment | लैंगिक अत्याचारग्रस्त महिलांना सव्वा कोटींचे अर्थसहाय्य

लैंगिक अत्याचारग्रस्त महिलांना सव्वा कोटींचे अर्थसहाय्य

Next

नीलेश जोशी /वाशिम : महिला अत्याचारांचे वाढते प्रमाण व त्यामुळे पूर्णत: खचून जाणार्‍या महिलांचे पुन्हा समाजात योग्य पद्धतीने पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने राज्यात सुरू करण्यात आलेल्या मनोधैर्य योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यातील बलात्कार पीडित महिलांसोबतच, अल्पवयीन मुली आणि तीन मुलांना येत्या काळात प्रत्येकी किमान दोन लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. आतापर्यंत २९ पीडितांना मदत करण्यात आली आहे. एकूण सव्वा कोटीची मदत पीडितांना दिली जाणार आहे. दरम्यान, यातील निम्मी रक्कम २९ पीडित महिलांना देण्यात आली असून, राज्यस्तरावरून उर्वरित प्रकरणात अद्याप निधी उपलब्ध न झाल्याने त्यांना मदतीची अद्याप प्रतीक्षा आहे. बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, अँसिड हल्ल्याच्या प्रकरणात गुन्हेगारांना गंभीर शासन करण्यात येत असले तरी अशा घटनांमध्ये पीडित महिला, युवतींचे मानसिक खच्चीकरण झालेले असते. समाजातही त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलतो. त्यामुळे अशा प्रकरणात जिल्हास्तरावरील क्षती सहाय्य व पुनर्वसन मंडळाच्या माध्यमातून प्रकरणाची गंभिरता विचारात घेता किमान दोन लाख ते तीन लाख रुपयांपर्यंतची मदत पीडित व्यक्तीला केली जाते. सोबतच समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन करण्यासोबतच, त्यांना मानसिक आधार देण्याचे कार्य केले जाते. राज्यात दोन ऑक्टोबर २0१३ पासून ही योजना कार्यान्वित झाली आहे. त्यानुषंगाने वाशिम जिल्ह्यातील या घटनांचा आढावा घेतला असता २0 महिन्यात वाशिम जिल्ह्यात ८५ लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्याचे पोलीस दप्तरी नोंद झाली आहे. विशेष म्हणजे बलात्कार होण्याच्या या घटनांमध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या मुलींच्या पुनर्वसनाचा प्रश्नही जिल्ह्यात गंभीर बनत आहे. फूस लावून पळवणे, लैंगिक अत्याचार, जबरी संभोग अशा प्रकारचे अत्याचार या मुलींवर झाले आहेत.

Web Title: Savvy crores subsidy for women affected by sexual harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.