‘महा-डीबीटी’ पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज मागविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 07:00 PM2020-12-31T19:00:11+5:302020-12-31T19:02:15+5:30
Scolorship News ‘: महा-डीबीटी’ पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज मागविले आहेत.
वाशिम : विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेलादेखील ‘महा-डीबीटी’ पोर्टलची जोड देण्यात आली असून, सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी यासह सर्व प्रकारातील शिष्यवृत्तीचे अर्ज ‘महा-डीबीटी’ पोर्टलवर भरण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी ३१ डिसेंबर रोजी केले.
अनुसूचित जाती, विजाभज, इमाव आणि विमाप्र या प्रवर्गासाठी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजना व इतर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात.सन २०२०-२१ मध्ये या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे व इतर योजनांचे अर्ज हे ‘महा-डीबीटी’ संकेतस्थळावरील नोटीस विभागामध्ये देण्यात आलेल्या कालावधीनुसार भरून घ्यावे लागणार आहेत. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे व नूतनीकरणाचे अर्ज भरण्याची कार्यवाही सुरु झालेली आहे. संबंधित महाविद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याबाबत माहिती द्यावी, अशा सूचनाही केदार यांनी प्राचार्यांना दिल्या. या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या कालावधीनुसार संबंधित महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती योजनांसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून विहित कालावधीमध्ये सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय वाशिम यांच्याकडे आॅनलाईन पाठवावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त केदार यांनी केले.