शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:39 AM2021-04-13T04:39:55+5:302021-04-13T04:39:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : : गत एक वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यातच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : : गत एक वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यातच शिक्षणमंत्र्यांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विद्यार्थी निर्धास्त झाले आहेत. शासन शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन परीक्षा घेऊ शकते, तर मग शाळेची का नाही? असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
कोरोनामुळे शिक्षण क्षेत्र मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. एक वर्षापासून शाळा व महाविद्यालये बंद आहेत. मागच्या वर्षी १७ मार्च २०२० रोजी जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या.
आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा दोन महिने तर सहावी ते आठवीपर्यंतच्या शाळा केवळ २० दिवस सुरू राहिल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण होऊ शकले नाही. ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाचा फज्जा उडाला.
कधी भारनियमन तर कधी रेंज नसल्याने शिक्षण मिळू शकले नाही. त्यातच शिक्षणमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर पालकांनी रोष व्यक्त केला आहे. ऑनलाईन परीक्षा हा पर्याय होता.
शिक्षण ऑनलाईन दिल्या जात आहे, तर परीक्षाही ऑनलाईन घ्यायला हव्या होत्या. शिष्यवृत्तीच्या परीक्षा घेणे शक्य आहे, तर शाळेच्या का नाही, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
शासनाने कोरोनाची परिस्थिती हाताळताना शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्येत घट आली होती. मृत्यूसंख्याही आटोक्यात होती. मात्र, यावेळी शाळा सुरू करण्यास विलंब करण्यात आला. तसेच प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत, याबाबतही पालकांनी रोष व्यक्त केला आहे.
०००
पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देता उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी घेतला आहे. अनेकदा कालसापेक्ष निर्णय घ्यावे लागतात. हा निर्णय कुणाच्या मतानुसार नाही तर सध्या उद्भवलेल्या परिस्थितीनुसार घेतला आहे. आगामी काळात परिस्थिती निवळल्यावर शिक्षणाची उणीव भरून काढता येईल. शिक्षण मंत्र्यांनी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्याना परीक्षा न देता उत्तीर्ण करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे.
- मोहन सिरसाट
ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ.
०००
विद्यार्थ्यांना परीक्षा न देता उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण हक्क कायद्यानुसार योग्य आहे. शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण दिले आहे. विद्यार्थ्यांना जे शिकविले त्याचे आकलन झाले की नाही, हे पाहण्याकरिता वर्ग ९ आणि ११ च्या प्रत्येक विद्यार्थ्याची ऑनलाईन तोंडी परीक्षा घेता आली असती. ऑनलाईन शिक्षण दिल्याने फायदा होतो की पर्याय शोधायला हवा, हेही कळले असते. नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा घेऊनच त्यांना पुढील वगॉसाठी प्रवेश पात्र ठरविता आले असते.
- अभिजित जोशी,
शिक्षण तज्ज्ञ
०००
ही ढकलगाडी काय कामाची
चांगले शिक्षण घेण्याकरिता परीक्षा आवश्यकच आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होते. विद्यार्थी अधिक जोमाने अभ्यास करतात.
परीक्षाच झाल्या नाही तर अभ्यासाचे महत्त्वच राहणार नाही.