कारखेड्यातील शाळांची घंटा १५ जुलैला वाजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:25 AM2021-07-12T04:25:49+5:302021-07-12T04:25:49+5:30
कोरोना संकटामुळे गेल्या १५ महिन्यांपासून सर्वच ठिकाणच्या शाळा बंद आहेत. यामुळे २०१९-२०, २०-२१ या दोन्ही शैक्षणिक सत्रांत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ...
कोरोना संकटामुळे गेल्या १५ महिन्यांपासून सर्वच ठिकाणच्या शाळा बंद आहेत. यामुळे २०१९-२०, २०-२१ या दोन्ही शैक्षणिक सत्रांत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. यंदाही नियोजित तारखेस कुठल्याच शाळेची घंटा वाजली नाही.
दरम्यान, शासनाच्या निर्देशानुसार १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे अधिकार ग्रामपंचायत व कोविड समितीला देण्यात आले. कारखेडा ग्रामपंचायतीने ग्रामस्थांचे कोविडपासून रक्षण करण्यासाठी युद्धस्तरावर लसीकरण मोहीम राबविली. त्यामुळे गाव बहुतांश सुरक्षित झाले असल्याने १० जुलै रोजी कारखेडा ग्रामपंचायत सरपंच सोनाली बबनराव सोळंके यांनी मासिक बैठक आयोजित करून आठवी ते बारावीच नव्हे; तर इयत्ता पहिलीपासून सातवीपर्यंतचे वर्गही सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावेळी उपसरपंच अनिल काजळे, केंद्रप्रमुख अशोक ठाकरे, के.एल. देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश आडे, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक गोविंद पोतदार, रणजित जाधव, तलाठी सागर चौधरी, ग्रामसेवक अनिल सूर्य, पोलीस पाटील वासुदेव सोनोने, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध जाधव यांची उपस्थिती होती.
.................
दोन महिन्यांपासून गाव कोरोनाबाबत निरंक
कारखेडा येथे गेल्या दोन महिन्यांपासून एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे सरपंचांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, के.एल. देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक आदींचा समावेश असलेली ग्रामसमिती गठीत करून शाळा सुरू करण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला.
...................
गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मागविले जाणार
कारखेडा गाव लसीकरणात अव्वल ठरण्यासह गेल्या दोन महिन्यांपासून कोविडमुक्त असल्याने इयत्ता १ ते ७ पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. तो योग्य आहे किंवा नाही, यासंदर्भात सोमवारी गटशिक्षणाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मागविले जाणार असल्याचे सरपंच सोनाली सोळंके यांनी सांगितले.