स्थानिक प्रशासनाची संमती असेल तरच शाळेची घंटा वाजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 03:57 PM2020-06-28T15:57:20+5:302020-06-28T15:57:44+5:30
नियोजित वेळापत्रकानुसार शाळा सुरू करण्यासंदर्भात किती स्थानिक प्रशासनाची संमती आहे याचा आढावा शिक्षणाधिकाºयांमार्फत घेतला जात आहे.
- संतोष वानखडे
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर स्थानिक प्रशासनाच्या संमतीशिवाय कुठेही शाळा सुरू नये, अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने सर्व शिक्षणाधिकाºयांना २४ जूनला दिल्या. या सुचनांच्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाची शाळा सुरू करण्यास संमती आहे की नाही यासंदर्भात शिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे आता आढावा घेतला जात आहे.
राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विपरित परिस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थिती शाळा सुरू कराव्या की नाही यावर विचारमंथन सुरू आहे. सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात कोणते वर्ग केव्हापासून सुरू करावे यासंदर्भात राज्य शासनाने १५ जून रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. परंतू, याबाबत अधिक स्पष्टता नसल्याने काही ठिकाणी संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने २४ जून रोजी राज्यातील सर्व शिक्षणाधिकाºयांना, शाळा सुरू करण्यापूर्वी कोणती दक्षता घ्यावी याबाबत स्पष्ट सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक पातळीवर तेथे कोरोनाबाधित रुग्ण आहे का, शाळा क्वारंटीनसाठी प्रशासनाच्या ताब्यात आहे का तसेच स्थानिक प्रशासनाची शाळा सुरू करण्यासंदर्भात संमती आहे का या तीन प्रमुख मुद्दे विचारात घेतले जाणार आहेत. स्थानिक प्रशासनाच्या संमतीशिवाय शिक्षण विभागातील कोणत्याही अधिकाºयांनी शाळा सुरू करण्याबाबत, शिक्षक उपस्थितीत्बाबत कोणतेही निर्देश देऊ नये, अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने शिक्षणाधिकाºयांना दिल्या. तसेच ज्या ठिकाणी शाळा क्वारंटीनसाठी प्रशासनाने ताब्यात घेतली असेल, त्या ठिकाणी शाळा मुख्याध्यापकांच्या ताब्यात येईपर्यंत कोणत्याही शिक्षकाला शाळेत बोलावू नये, असेही शालेय शिक्षण विभागाने शिक्षणाधिकाºयांना बजावले. या अनुषंगाने नियोजित वेळापत्रकानुसार शाळा सुरू करण्यासंदर्भात किती स्थानिक प्रशासनाची संमती आहे याचा आढावा शिक्षणाधिकाºयांमार्फत घेतला जात आहे. हा आढावा पूर्ण झाल्यनंतर नियोजित वेळापत्रकानुसार किती ठिकाणी शाळा सुरू होऊ शकतील, याची निश्चित माहिती शिक्षण विभागाला मिळणार आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या सुचनेनुसार वाशिम जिल्ह्यात यासंदर्भात कार्यवाही केली जात आहे. स्थानिक प्रशासनाची संमती असेल तरच शाळा सुरू केल्या जातील. आॅनलाईन शिक्षण देण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे.
- अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद वाशिम