स्कूल बस चालकांना १४ महिन्यांपासून नाही काम; काहीजण विकतात भाजीपाला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:42 AM2021-05-19T04:42:18+5:302021-05-19T04:42:18+5:30
वाशिम : कोरोनाचा सर्वाधिक फटका हा स्कूलबस चालक, मालकांना बसला आहे. गेल्या १४ महिन्यांपासून स्कूलबसची चाके एका जागेवरच असल्याने ...
वाशिम : कोरोनाचा सर्वाधिक फटका हा स्कूलबस चालक, मालकांना बसला आहे. गेल्या १४ महिन्यांपासून स्कूलबसची चाके एका जागेवरच असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काही चालकांना भाजीपाला विकावा लागत आहे तर काही चालकांना शेती मोलमजुरीची कामे करण्याची वेळ आली आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसगार्चा प्रादुर्भाव वाढला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात गेल्यावर्षी२४ मार्चपासून ते जून महिन्यापर्यंत लॉकडाऊन होता. जून महिन्यापासून अनलॉकचे टप्पे सुरू झाले. त्यामुळे टप्प्याटप्प्याने बहुतांश उद्योग, धंदे सुरू झाले दुसरीकडे नर्सरी ते आठवीचे वर्ग सुरू झाले नाहीत. त्यामुळे स्कूल बसची चाकेही जागेवरच होती. याचा सर्वाधिक फटका स्कूलबसच्या मालक, चालकांना बसला आहे. ९ ते १२ वीचे वर्ग केवळ एका महिन्यासाठी सुरू राहिले. गत १४ महिन्यांपासून स्कूल बस धावल्या नसल्याने चालक, मालकांसमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? असा पेच निर्माण झाला. स्कूल बसमधून खासगी प्रवासी वाहतूकदेखील करता येत नसल्याने स्कूलच्या अनेक चालकांना पर्यायी व्यवसाय शोधावा लागत आहे. काही जणांनी भाजीपाला विक्री, काहींनी शेतात मजूरी तर काहींनी ट्रॅक्टरचे स्टेअरिंग हातात घेतले आहे. १४महिन्यांपासून वाहन उभे असतानाही विविध प्रकारचा कर भरण्याची वेळ आली आहे. यामुळे स्कूलबसच्या मालकांसमोरही आर्थिक प्रश्न निर्माण झाला. काहींनी पर्यायी व्यवसाय सुरू केला तर काही जणांना घरी बसण्याशिवाय पर्याय नाही. काही चालकांनी अन्य वाहनावर चालक म्हणून रोजगार शोधला आहे. काही स्कूल व्हॅन, आॅटोवाल्यांनी शहरात खासगी प्रवासी वाहतूक करण्याचा प्रयल चालविला. मात्र, यामध्ये फारसे यश नाही,
00
रमेश ठाकरे, स्कूलबस चालक,
शेतीत काम करतात...
गेल्या दीड वर्षांपसाून स्कूलबस बंद असल्याने आर्थिक पेच निर्माण झाला. ठाकरे यांच्या घरात पत्नीमह आई, दोन मुले आहेत. सर्वांची जबाबदारी एकटयावर आहे. घर चालविन्याकरिता काही तरी मिळकत हवी म्हणून ते शेतीमध्ये काम करीत आहेत. मात्र, यामधूनही फारसे उत्पन्न हाती येत नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
००००००
शिवाजी भिसडे, स्कूल बसचालक
ट्रॅक्टरवर मजुरी करतात..
शिवाजी भिसडे हे स्कूल बस चालक असून, त्यांच्या कुटुंबात आई, वडील, पत्नी आहे. ते घरातील कर्ता पुरूष असून, उदरनिर्वाहासाठी दुसरे साधन नाही. सरकारनेदेखील चालक, मालकांसाठी पॅकेज दिले नाही. स्कूलबस बंद असल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ट्रॅक्टरवर मजुरी म्हणून काम करावे लागत आहे, असे त्यांनी सांगितले.
000
पांडुरंग लोखंडे, स्कूलबस चालक
पांडुरंग लोखंडे यांच्याबरोबरच त्यांचा भाऊदेखील बस चालक आहे. कुटुंबात आई, वडील, भाऊ व पत्नी आहे. घरी शेती असून, स्कूलबस बंद असल्यामुळे शेतात काम करावे लागत आहे. आई- वडीलदेखील शेती करतात. स्कूलबस केव्हा सुरू होतील, याकडे लक्ष लागल्याचे लोखंडे बंधुंनी सांगितले.
०००००
अरविंद देशमुख, स्कुलबस मालक
स्कूलबस बंद असल्याने आर्थिक पेच निर्माण झाला. त्यातच फायनान्सवाले हे नियमित हप्ता भरण्यासाठी तगादा लावतात. वेळप्रसंगी वाहन नेण्याची धमकी देतात. काही फायनान्स कंपन्यांनी तशी कार्यवाही करणे सुरु केले. कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा की फायनान्सचे हप्ते भरावे? असा पेच स्कूलबस मालकांसमोर उभा ठाकल्याचे देशमुख यांनी सांगितले. ते सध्या शेती करीत आहेत.
०००००००००००
उमेश जाधव, स्कूलबस चालक,
उमेश जाधव हे मालेगाव येथे स्कूल बस चालक म्हणून काम करतात. १४ महिन्यांपासून कोरोनामुळे स्कूलबस बंद आहेत. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हा महत्वाचा प्रश्न आहे. काही दिवस ऊसनवारी करून उदरनिर्वाह केला. मिळेल ते काम करण्याची वेळ आली आहे. सरकारने एखादे पॅकेज जाहिर करून स्कूलबस चालक, मालकांना दिलासा देणे अपेक्षीत ठरत आहे, असे उमेश जाधव यांनी सांगितले.
००००००००००००
मुले दररोज स्कूलबसने प्रवास करायचे १७२००
जिल्ह्यातील स्कूलबस, आॅटो ४३०
जिल्ह्यातील एकूण चालक ५६०