१५ महिन्यांपासून स्कूल बस जागीच उभ्या; कर्जावरील व्याज चालले वाढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:25 AM2021-07-12T04:25:37+5:302021-07-12T04:25:37+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी शैक्षणिक सत्र शेवटच्या टप्प्यात आले असताना शाळा बंद करण्यात आल्या. तेव्हापासून त्या अद्यापपर्यंत सुरूच ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी शैक्षणिक सत्र शेवटच्या टप्प्यात आले असताना शाळा बंद करण्यात आल्या. तेव्हापासून त्या अद्यापपर्यंत सुरूच झालेल्या नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूलबस जागीच उभ्या ठेवाव्या लागत आहेत. हा रोजगार हिरावला गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्कूलबसच्या मालक व चालकांनी रोजमजुरीचे इतर पर्याय शोधल्याचे दिसून येत आहे.
...............
१५
शहरातील एकूण शाळा
१६
एकूण स्कूल बसेस
..............
गाडीवरील कर्ज कसे फेडणार?
गेल्या १५ महिन्यांपासून शाळाच बंद असल्याने स्कूलबसही जागीच उभ्या ठेवाव्या लागत आहेत. गेल्या काही दिवसांपासून उदरनिर्वाहासाठी दुसरे काम पत्करले; मात्र त्यातून घरखर्चच भागत नाही, तर गाडीवरील कर्ज कसे फेडावे, ही चिंता लागून राहिली आहे.
- बाळू टोचर
...................
स्कूलबसला शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करण्याचाच परवाना आहे. त्यामुळे बाहेरगावची एखादी ‘ट्रिप’ आली तर तीदेखील घेता येत नाही. गाडी जागीच उभी असल्याने ‘मेंटेनन्स’चा खर्चही लागणार आहे. त्यामुळे आता शाळा सुरू व्हायला हव्यात.
- गजानन दळवी
.........................
स्कूलबस खरेदी करण्यासाठी बॅंकेकडून कर्ज घेतले. शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करण्यातून मिळणाऱ्या पैशांमधून घरखर्च भागविण्यासह कर्जाचे हप्ते फेडले जायचे. ही स्थिती सुरळीत सुरू असतानाच शाळा बंद झाल्या. यामुळे आर्थिक संकट ओढवले आहे.
- बबन बारटक्के
........................
कोरोनाकाळात गेल्या १५ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. चालू वर्षीही शाळा सुरू होतील किंवा नाही, याची शाश्वती नाही. यामुळे हक्काचा रोजगार हिरावला असून इतरांच्या वाहनावर चालक म्हणून काम करावे लागत आहे.
- राहुल गायकवाड