३१ मे पर्यंत होणार स्कूल बसेसची फेरतपासणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 03:01 PM2019-05-16T15:01:13+5:302019-05-16T15:01:21+5:30
वाशिम : सुरक्षित प्रवासासाठी जिल्ह्यातील स्कूल बसेसची फेरतपासणी ३१ मे पर्यंत केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सुरक्षित प्रवासासाठी जिल्ह्यातील स्कूल बसेसची फेरतपासणी ३१ मे पर्यंत केली जाणार असून, स्कूल बसेसची फेरतपासणी न केल्यास वाहनाचा परवाना निलंबित केला जाईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने १५ मे रोजी दिला.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने ७ एप्रिल २०१६ रोजी दिलेल्या आदेशानुसार स्कुल बस म्हणून नोंदणी झालेल्या वाहनांना कार्यालयात फेरतपासणी करीता बोलावून त्या स्कुल बस नियमावली २०११ नुसार सुरक्षाविषयक तरतूदीचे काटेकारपणे पालन करतात किंवा कसे याबाबत तपासणी करावयाची आहे. त्यासाठी स्कूल बस मालकांनी स्कूल बस उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात किंवा शिबिरामध्ये प्रपत्र अ नुसार ३१ मे २०१९ पूर्वी हजर करुन स्कूल बसेसची फेर तपासणी करुन घ्यावी आणि तसा अहवाल प्राप्त करून घ्यावा, अशा सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दिल्या. जिल्ह्यात ९५ पेक्षा अधिक स्कूल बसेस आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी स्कूल बसेसची तपासणी करण्याची मागणी पालकांनी केली होती. स्कूल बसची फेर तपासणी न केल्यास वाहनाचा परवाना निलंबन केला जाईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दिला. फेर तपासणी न केलेले वाहन रस्त्यावर आढळल्यास जप्त करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व स्कूल बस मालकांनी आपल्या वाहनांची फेरतपासणी विहित मुदतीत करावी, अशा सूचना देण्यात आल्या.