आॅटो-दुचाकीच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 02:35 AM2017-07-27T02:35:04+5:302017-07-27T02:35:09+5:30
रिसोड : रिसोड ते मालेगाव रोडवरील चाफेश्वर मंदिराजवळील पुलाजवळ आॅटो व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने, आॅटोमधील ९ वर्षीय शाळकरी मुलगी ठार, तर चार जण जखमी झाल्याची घटना २६ जुलै रोजी सकाळी १० वाजेदरम्यान घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : रिसोड ते मालेगाव रोडवरील चाफेश्वर मंदिराजवळील पुलाजवळ आॅटो व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने, आॅटोमधील ९ वर्षीय शाळकरी मुलगी ठार, तर चार जण जखमी झाल्याची घटना २६ जुलै रोजी सकाळी १० वाजेदरम्यान घडली. अनुष्का गजानन देशमुख रा. करडा असे मृतक मुलीचे नाव आहे.
तालुक्यातील करडा येथून सकाळी ९ वाजताच्या सुमारास एमएच ३७ जी ३०७१ क्रमांकाच्या आॅटोने सात मुली शाळेसाठी रिसोडला निघाल्या. रिसोड शहरातील चाफेश्वर मंदिराजवळील वळण रस्त्यावर समोरून भरधाव येणाºया एमएच ३७ आर ६३८१ क्रमांकाच्या दुचाकीने आॅटोला समोरासमोर जबर धडक दिली.
यामध्ये आॅटो उलटल्याने आॅटोमधील अनुष्का देशमुख हिच्या डोक्याला जबर मार लागला, तर अन्य चार जण जखमी झाले. अनुष्काला तातडीने रिसोड येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी तिला वाशिमला हलविण्याचा सल्ला दिला. वाशिम येथे रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी अनुष्काला मृत घोषित केले.
या अपघातात शीतल शिवाजी धांडे (१५), अपेक्षा दगडू अंभोरे (१५), आॅटो चालक विनोद मोरे (३२), प्रतीक सचिन तुरूकमाने (७) असे चार जण जखमी झाले.
अनुष्काचे शिक्षणाचे स्वप्न राहिले अधुरे ...!
- अनुष्का ही स्थानिक भारत प्राथमिक शाळेत इयत्ता तिसºया वर्गात शिकत होती. अनुष्काच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बिकट असून, ते कापड दुकानात खासगी नोकरी करतात. मुलीला दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी अनुष्काला रिसोड येथील भारत प्राथमिक शाळेत टाकले होते.
- अनुष्कालादेखील शिक्षणाची गोडी होती. शिकून मोठे होण्याचे स्वप्न तिने पाहिले होते. गजानन देशमुख व कुटुंबानेदेखील स्वत: कष्ट सोसून तिचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शालेय साहित्यासह अन्य मागण्या पूर्ण करीत आले होते. शिक्षणाची स्वप्ने रंगवित असतानाच, बुधवारी अनुष्काच्या आॅटोला अपघात झाला.
- यामध्ये तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने दुपारी १२ वाजताच्या सुमारास अनुष्काच्या अपघाती निधनाची वार्ता देशमुख कुटुंबासह करडा गावात पोहोचली आणि सर्वांचे मन हळहळले. अपघाती निधनाने अनुष्काचे शिक्षणाचे स्वप्न अधुरेच राहिले. अनुष्काच्या मागे एक लहान भाऊ व आई-वडील असा परिवार आहे.