शिक्षकांसाठी आज उघडणार शाळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:27 AM2021-06-28T04:27:31+5:302021-06-28T04:27:31+5:30
वाशिम : कोरोनाकाळात शैक्षणिक कामकाज प्रभावित होऊ नये म्हणून चालू शैक्षणिक सत्रात २८ जूनपासून शिक्षकांसाठी शाळा सुरू होणार आहेत. ...
वाशिम : कोरोनाकाळात शैक्षणिक कामकाज प्रभावित होऊ नये म्हणून चालू शैक्षणिक सत्रात २८ जूनपासून शिक्षकांसाठी शाळा सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांना मात्र घरातच राहून ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे गिरवावे लागणार आहेत.
कोरोनामुळे गत दीड वर्षापासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. गतवर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यंदाही पहिली ते बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे यंदाही २८ जून रोजी विद्यार्थ्यांसाठी शाळेची घंटा वाजणार नाही. वाशिमसह विदर्भातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २७ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर केली. त्यानुसार शाळांचे शैक्षणिक वर्ष २८ जूनपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष वर्गात अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू होणार नसली तरी, शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज, दहावी व बारावीचा निकाल तयार करण्यासाठी मूल्यांकनाचे काम आदीसाठी शिक्षकांना शाळेत यावे लागणार आहे. कोणत्या वर्गातील शिक्षकांनी किती प्रमाणात उपस्थित राहावे, याबाबत शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेने मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या. मे महिन्यात संस्थात्मक विलगीकरणासाठी जिल्हा परिषद शाळेच्या काही वर्गखोल्या ताब्यात घेण्यात आल्या होत्या. २८ जूनपासून शाळा सुरू होणार असल्याने सर्व वर्गखोल्या शाळा प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आल्या. सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण झाले असून, २८ जूनला शिक्षकांसाठी शाळेची पहिली घंटा वाजणार आहे.
.....................
बॉक्स
अशी राहील शिक्षकांची उपस्थिती...
१) इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावीचे ५० टक्के तसेच दहावी व बारावीचे १०० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य राहील.
२) शिक्षकेतर कर्मचारी यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य राहील.
३) प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे.
.....
कोट बॉक्स
२८ जूनपासून जिल्ह्यातील शाळा शिक्षकांसाठी सुरू होणार आहेत. सर्वांना मार्गदर्शक सूचना दिलेल्या असून कोरोनाविषयक नियमांचे पालन करून प्रशासकीय, ऑनलाईन शैक्षणिक कामकाज होणार आहे.
- रमेश तांगडे
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वाशिम
००
मे महिन्यात जिल्हा परिषदेच्या काही शाळांच्या वर्गखोल्या संस्थात्मक विलगीकरणासाठी ताब्यात घेतल्या होत्या. शिक्षकांसाठी शाळा सुरू होणार असल्याने सर्व वर्गखोल्या शाळांच्या ताब्यात दिल्या असून, निर्जंतुकीकरण करण्यात आले.
- अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम
000000000000000
एक नजर शाळांवर...
जि. प. शाळा - ८१३
खासगी अनुदानित शाळा - १८४
खासगी विनाअनुदानित शाळा - ४२२