दहावीच्या निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:26 AM2021-06-30T04:26:42+5:302021-06-30T04:26:42+5:30
वाशिम : दहावीच्या मूल्यमापन प्रक्रियेत शाळांच्या गुणदान प्रक्रियेसाठी केवळ चार दिवस शिल्लक आहेत. जिल्ह्यातील जवळपास ८० टक्के शाळांनी हा ...
वाशिम : दहावीच्या मूल्यमापन प्रक्रियेत शाळांच्या गुणदान प्रक्रियेसाठी केवळ चार दिवस शिल्लक आहेत. जिल्ह्यातील जवळपास ८० टक्के शाळांनी हा टप्पा पूर्ण केला असून, उर्वरित २० टक्के शाळांना लवकरच गुणदान प्रकियेचा टप्पा पूर्ण करावा लागणार आहे. दहावीच्या निकालास उशीर झाल्यास संबंधित शाळाच जबाबदार राहतील, असा इशारा शिक्षण विभागाने दिला.
गतवर्षी मार्च महिन्यापासून देशात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्याने विद्यार्थ्यांसाठी शाळा बंदच होत्या. यंदाही पहिली ते बारावीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या. मूल्यमापनानुसार गुणदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. जिल्ह्यात माध्यमिकच्या ३६३ शाळा असून, जवळपास ८० टक्के शाळांनी गुणदानाचा टप्पा पूर्ण केल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
०००००००००००००
दहावीतील एकूण विद्यार्थी १९७१५
मुले १०६४६
मुली ९०६९
००००००
८० टक्के शाळांनी टप्पा पूर्ण केला
१) जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण देणाऱ्या ३६३ शाळा आहेत. निकाल वेळेवर लागावा याकरिता गुणदान प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी, अशा सूचना शिक्षण विभागाने सर्व मुख्याध्यापक, संबंधित शिक्षकांना दिल्या होत्या.
२) निर्बंधाच्या कालावधीतही दहावी व बारावीच्या शिक्षकांना मूल्यमापन प्रक्रिया, गुणदानाच्या कामासाठी शाळेत उपस्थित राहण्यास सांगितले होते.
३) आतापर्यंत जिल्ह्यातील ८० टक्के शाळांनी गुणदान प्रक्रियेचा टप्पा पूर्ण केला असून, उर्वरित शाळांनी तातडीने टप्पा पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
०००००
कोट (शिक्षणाधिकारी)
यंदा कोरोनामुळे शासनाने दहावी, बारावीची परीक्षा रद्द केली. मूल्यमापनानुसार गुणदान प्रक्रिया असून, संबंधित शिक्षकांनी वेळेच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करावी, याबाबत सर्वांना सूचना दिल्या. ऑनलाईन पद्धतीने आढावादेखील घेण्यात आल्या. निकालास विलंब झाला, तर त्याला संबंधित शाळाच जबाबदार राहतील, असा इशाराही दिला होता. आतापर्यंत ८० टक्के शाळांनी गुणदान प्रक्रियेचा टप्पा पूर्ण केला.
- रमेश तांगडे
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वाशिम
००००००००००
वेळेवर प्रक्रिया पार पाडण्याचा प्रयत्न
निर्बंध, तांत्रिक अडचणी यामुळे कधी-कधी व्यत्ययही आला. मूल्यमापनानुसार गुणदान प्रक्रिया वेळेपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
- दीपक अवचार, शिक्षक
०००
गुणदान प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी काही अडचणींना सामोरे जावे लागले. वेळेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली.
- विलास खोरणे
शिक्षक