दोन महिन्यानंतर मिळाले शालेय गणवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 04:13 PM2018-09-03T16:13:19+5:302018-09-03T16:13:27+5:30
आसेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक उर्दू केंद्र शाळेत ३ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव (वाशिम) : शासनाचा मोफत शालेय गणवेश योजनेंतर्गत दोन महिन्यांनी आसेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक उर्दू केंद्र शाळेत ३ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले. मोफत गणवेश योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना गणवेश वितरणाची मागणी सतत करण्यात येत होती.
शासनाच्या मोफत शालेय गणवेश वितरण योजनेत यंदा बदल करून विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश देण्याचे निश्चित करण्यात आले होते. या योजनेंतर्गत मंजूर झालेला निधी मुख्याध्यापकांच्या खात्यात वळता करून शाळा समितीच्या मार्फत विद्यार्थ्यांना गणवेश वितरण करण्यात येणार होते; परंतु शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर अनेक दिवस उलटूनही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नव्हते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांकडून सतत गणवेश वितरणाची मागणी सुरू होती. अखेर ३ सप्टेंबर रोजी मंगरूळपीर पंचायत समिती अंतर्गत येणाºया आसेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक उर्दू केंद्र शाळेत वर्ग १ ली ते ७ वीपर्यंतच्या दारिद्र्य रेषेखालील १३९ विद्यार्थीनी आणि ४१ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेशाचे वितरण करण्यात आले. केंद्र प्रमुख आर. एच. खंडारे यांच्या मार्गदर्शनात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख हारून कुरैशी, उपाध्यक्ष एजाज खान, सदस्य जमिल कुरैशी, शेख सलीम, अध्यापक साजिद खान परवेज, काजी सलीम, जावेद अख्तर, मोहम्मद मुदस्सीर, जुबैर अहमद खान पटेल, शिक्षिका फरजाना परवीन खलिल खान, तसेच परवीन बानो यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापक मोहम्मद जावेद शेख मुसा यांच्या हस्ते गणवेश वितरित करण्यात आले.