वाशिम जिल्ह्यात शाळा, अंगणवाड्यांमध्ये ‘बेटी बचाओ - बेटी पढाओ’चा जागर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 02:11 PM2017-10-15T14:11:30+5:302017-10-15T14:12:25+5:30
वाशिम : ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत ९ ते १४ आॅक्टोबरदरम्यान वाशिम जिल्ह्यात जनजागृतीपर सप्ताह राबविण्यात आला.
वाशिम : ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत ९ ते १४ आॅक्टोबरदरम्यान वाशिम जिल्ह्यात जनजागृतीपर सप्ताह राबविण्यात आला. या दरम्यान, शाळा, अंगणवाडी केंद्रांत ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ची प्रतिज्ञा घेण्यात आली.
‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’संदर्भात व्यापक जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इंगळे यांच्या मार्गदर्शनात ९ ते १४ आॅक्टोबरदरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात आले. १० आॅक्टोबरला प्रभातफेरी, ११ आॅक्टोबरला मुलीच्या जन्माचे स्वागत व पालकांचे अभिनंदन, मुलींच्या नावे वृक्षारोपण, १३ आॅक्टोबरला आरोग्य व पोषण यासंदर्भात जनजागृती, विविध माध्यमातून बेटी बचाओ-बेटी पढाओचा संदेश देण्यात आला. १४ आॅक्टोबरला सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे या सप्ताहाचा समारोप करण्यात आला. प्राथमिक शाळा तसेच अंगणवाडी केंद्रात बेटी बचाओ-बेटी पढाओची प्रतिज्ञा घेण्यात आली. वाशिम येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी प्रतिज्ञा घेतली तर शाळा, अंगणवाडीत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. उमरा कापसे, पिंपळगाव, सापळी, सावरगाव, उकळीपेन, टो यासह ग्रामीण भागात ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ'संदर्भात विविध कार्यक्रम घेण्यात आले. वाशिमचे बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक, अभियानाचे जिल्हा समन्वयक रुपेश निमके, विस्तार अधिकारी तुषार जाधव यांच्यासह सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.