‘लोकमत’चा दणका : पोषण आहारासाठी शाळांना मिळाले अन्नधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 02:33 PM2020-02-22T14:33:16+5:302020-02-22T14:33:26+5:30
‘लोकमत’ने २० फेब्रुवारी रोजी वृत्तही प्रकाशित केले होते. धान्य न मिळालेल्या काही शाळांना त्याच दिवशी धान्याचा पुरवठा झाला.
वाशिम : पोषण आहारासाठी लागणारे तांदूळ व धान्यादी माल संबंधित शाळांना मिळाला असून, त्यामुळे विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. रिसोड तालुक्यातील ४ शाळांना धान्याची गरज नसल्याने त्या शाळांनी नव्याने आलेला माल परत केला, अशी माहिती शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी २१ फेब्रुवारी रोजी दिली.
विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती वाढविणे, आहारातून पोषक तत्वे मिळावी, गरजू विद्यार्थ्यांना शाळेतच मध्यान्ह भोजनाचा आस्वाद घेता यावा या उद्देशातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, अनुदानित व अंशत: अनुदानित खासगी शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. जिल्ह्यात तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा करण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराचा करार १४ फेब्रुवारी २०२० रोजी संपुष्टात आला. धान्याचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून संबंधित कंत्राटदारालाच जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्याचे अन्नधान्य पुरविण्याच्या सूचना दिल्या होत्या. दोन महिन्यांचे धान्य संबंधित शाळांना पुरविताना संबंधित कंत्राटदारांची दमछाक झाली. विशेषत: रिसोड तालुक्यातील काही खासगी अनुदानित शाळांना विलंबाने धान्याचा पुरवठा झाला तर काही शाळांना धान्य मिळणे बाकी होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने २० फेब्रुवारी रोजी वृत्तही प्रकाशित केले होते. धान्य न मिळालेल्या काही शाळांना त्याच दिवशी धान्याचा पुरवठा झाला. रिसोड तालुक्यातील चार शाळांकडे धान्यसाठा असल्याने त्यांनी नवीन धान्य परत पाठविले.
शालेय पोषण आहारासाठी लागणारे धान्य संपले होते. २० फेब्रुवारी रोजी आमच्या शाळेला तांदूळ प्राप्त झाले.
-भारत पवार,
राजस्थान प्राथमिक मराठी शाळा रिसोड