शैक्षणिक सत्र सुरू होईपर्यंत शाळांना ‘खाते मान्यता’ घेता येणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 04:24 PM2020-06-02T16:24:23+5:302020-06-02T16:24:45+5:30
शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शैक्षणिक सत्र सुरू होईपर्यंत खाते मान्यता वर्धित करण्याला २९ मे रोजी मान्यता दिली.
वाशिम : अमरावती विभागातील बहुतांश शाळांचा खाते मान्यता वर्धित कालावधी मे २०२० मध्ये संपुष्टात आला. ‘कोरोना’च्या प्र्रादुर्भावामुळे अनेक शाळांना खाते मान्यतेला परवानगी (वर्धित करणे) घेता आली नाही. या पृष्ठभूमीवर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शैक्षणिक सत्र सुरू होईपर्यंत खाते मान्यता वर्धित करण्याला २९ मे रोजी मान्यता दिली.
दरवर्षी शाळांच्या भौतिक सुविधा व गुणवत्ता दर्जा संदर्भात शाळेची खाते मान्यता घ्यावी लागते. जिल्हास्तरीय शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर हा प्रस्ताव महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्य शिक्षण मंडळ अमरावती आणि त्यानंतर शासनाकडे पाठविला जातो. शाळांची खाते मान्यता वर्धित नसल्यास विद्यार्थ्यांची दहावी, बारावीची माहिती भरताना अडचणी येतात. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची (अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित) खाते मान्यतेला परवानगी घेण्याचा कालावधी ३१ मे २०२० रोजी संपुष्टात आली. कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने अनेक शाळांना या कालावधीत खाते मान्यतेची कार्यवाही करता आली नाही. खाते मान्यता घेण्याला मुदतवाढ देण्याची मागणी शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांच्याकडे केली होती. शाळांची गैरसोय होउ नये म्हणून शैक्षणिक सत्र सुरु होईपर्यंत अर्थात २६ जून पर्यंत खाते मान्यतेची कार्यवाही करण्याला शिक्षण उपसंचालक पेंदोर यांनी मुदतवाढ दिली.