वाशिम जिल्ह्यातील भंगार शासकीय वाहनांचा लिलाव रखडलेलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 01:27 PM2018-07-23T13:27:10+5:302018-07-23T13:28:44+5:30
वाशिम : जिल्ह्यातील सर्वच विभागाच्या विविध शासकीय कार्यालयांत भंगार वाहने जैसे-थे पडल्याचे चित्र दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विविध शासकीय कार्यालयांमध्ये पडून असलेली निरूपयोगी, भंगार, निर्लेखित वाहनांची विक्री चालू महिना संपण्यापूर्वी लिलावाद्वारे करण्याच्या सूचना वित्त विभागाने सर्व कार्यालय प्रमुखांना १३ आॅगस्ट २०१५ रोजी दिल्या होत्या. त्या संदर्भात जिल्हास्तरावर पत्रही पाठविण्यात आले होते; परंतु या सुचनेला तीन वर्षे उलटत आली तरी, जिल्ह्यातील सर्वच विभागाच्या विविध शासकीय कार्यालयांत भंगार वाहने जैसे-थे पडल्याचे चित्र दिसत आहे.
विविध शासकीय कार्यालयांमध्ये पडून असलेली निरूपयोगी, भंगार, दुरुस्ती न होण्यासारखी अथवा अतिरिक्त असलेल्या शासकीय भांडार वस्तू, यंत्रसामग्री, तसेच वाहनांचा लिलाव करण्याच्या सूचना सर्व प्रशासकीय विभागांना राज्याच्या वित्त विभागाकडून ३ वर्षांपूर्वी देण्यात आल्या आहेत. या लिलावातून जमा झालेली रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्याच्याही सुचना होत्या. तत्पूर्वी, बंद पडलेल्या वाहनांचे निर्लेखन प्रमाणपत्र परिवहन विभागाकडून घ्यावे लागणार होते. त्यानंतर वाहनांची विक्री करण्याचे प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करताना, यापूर्वी निर्लेखित वाहनांपैकी किती वाहनांची विक्री करण्यात आली आणि त्यातून शासनाला किती निधी प्राप्त झाला, याबाबत सविस्तर माहितीही सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. ही कार्यवाही न केल्यास नवीन वाहनांच्या खरेदीच्या प्रस्तावांना मान्यता मिळणार नसल्याचे वित्त विभागाने स्पष्ट केले होते. आता वित्त विभागाच्या निर्णयाला ३ वर्षे उलटत आली तरी, जिल्ह्यातील प्रत्येक विभागाच्या विविध ठिकाणच्या कार्यालयांत असंख्य वाहने पडून असल्याचे दिसत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेचे लघू सिंचन, आरोग्य, पाटबंधारे विभाग, पंचायत समित्या, तहसील कार्यालयांत अद्यापही भंगार वाहने पडूनच असल्याचे दिसत आहे.