अवैध वीजजोडणी प्रकरणावर पडदा टाकण्याच्या हालचाली!
By admin | Published: August 14, 2015 01:01 AM2015-08-14T01:01:59+5:302015-08-14T01:01:59+5:30
अनसिंगच्या प्रकरणाला वेगळे वळण; वीज चोरी भोवती फिरते कारवाई.
संतोष वानखडे/वाशिम : वाशिम तालुक्यातील अनसिंग ग्रामपंचायतच्या वीजचोरीचा गोरखधंदा ह्यलोकमतह्णने १0 ऑगस्ट रोजी स्टिंग ऑपरेशनद्वारे चव्हाट्यावर आणताच, पडद्यामागील घडामोडी हळूहळू उजेडात येत आहेत. दरम्यान, केवळ अवैध वीजजोडणी तोडून सदर प्रकरण रफादफा करण्याच्या दिशेने वीज वितरण कंपनीचे पाऊल पडत असल्याचे एकंदरित परिस्थितीवरून दिसून येते. वीज गळती व वीज चोरी या दोन प्रमुख समस्यांनी वीज वितरण कंपनीची डोकेदुखी वाढविली आहे. वीजचोरी रोखण्यासाठी वीज वितरण कंपनी सर्वतोपरी प्रयत्नशील असतानाच, वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे नेमके याऊलट घडले. वीज वितरण कंपनी शाखा अनसिंगच्या अधिकारी-कर्मचार्यांनी, पथदिव्यांच्या अवैध वीजजोडणीला अभय देऊन एकप्रकारे कंपनीच्या डोळ्यात धूळफेक केली असल्याचा सूर सर्वसामान्य ग्राहकांमधून उमटत आहे. तब्बल एका महिन्यापासून अनसिंगातील पथदिवे दिवसाही सुरू होते. या पथदिव्यांना अवैध वीजजोडणी दिल्याने साहजिकचा याचा आर्थिक भार अन्य ग्राहकांच्या खात्याकडे वळता झाला. हा प्रकार वीज वितरण कंपनी शाखा अनसिंगच्या अधिकारी व कर्मचार्यांना माहित असतानाही, याविरूद्ध कुणी कारवाईचा बडगा उगारू नये, ही बाब कुठेतरी पाणी मुरत असल्याच्या बाबीला दुजोरा देणारी ठरत आहे. ह्यलोकमतह्णने स्टिंग ऑपरेशनद्वारे हा प्रकार उजेडात आणल्यानंतर वरिष्ठ स्तरावरून अवैध वीजजोडणी तोडण्याबाबत जलदगतीने चक्रे फिरली. मात्र, तुर्तास तरी ही कारवाई अवैध वीजजोडणी तोडण्यापुरती र्मयादीत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.