अपात्र शिधापत्रिकेची शाेधमाेहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:38 AM2021-02-12T04:38:44+5:302021-02-12T04:38:44+5:30
सार्वजनिक वितरण व्यवस्था (नियंत्रण)आदेश २०१५ मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतन प्रक्रिया आहे. त्यामुळे अपात्र शिधापत्रिका शोधून रद्द करण्याकरिता ...
सार्वजनिक वितरण व्यवस्था (नियंत्रण)आदेश २०१५ मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतन प्रक्रिया आहे. त्यामुळे अपात्र शिधापत्रिका शोधून रद्द करण्याकरिता खास शोधमोहीम राबविणे आवश्यक असल्याने राज्यातील कार्यरत बीपीएल,अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी ,शुभ्र व आस्थापना कार्ड या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्याची शोधमोहीम १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत राबविण्याच्या सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून संबंधित कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविण्याबाबत तपासणी करण्यासाठी त्या त्या भागातील अधिकृत शिधावाटप दुकानातून शासकीय कर्मचारी,तलाठी,यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेत नमुना फॉर्म वाटप करण्यात येतील. हे फॉर्म विहित मुदतीत आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात जमा करण्यात यावे. हा फॉर्म भरून देताना फॉर्मसोबत शिधापत्रिकाधारकांनी ते त्या भागात राहत असल्याचा पुरावा द्यावा. पुरावा म्हणून उदा. भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, एलपीजी जोडणी क्रमांक, बँक पासबुक, विजेचे देयक, टेलीफोन देयक, ड्राइव्हिंग लायसन्स, ओळखपत्र आदींच्या प्रती घेता येईल, अशा सूचना दिल्या आहेत.
पात्रतेच्या पडताळणीसाठी दिलेला पुरावा हा एक वर्षाच्या कालावधीपेक्षा जुना नसावा. याची शिधापत्रिकाधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन शिधापत्रिकाधारकांना करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरावा सादर करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, तसेच त्याची आधीच जमवाजमव करावी लागणार आहे.
- आर. एस. खेडकर , पुरवठा अधिकारी, मानाेरा