वीटभट्ट्यांवर घेतला जातोय शाळाबाह्य बालकांचा शोध !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:39 AM2021-02-12T04:39:11+5:302021-02-12T04:39:11+5:30
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावरून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तथापि, विविध कारणांमुळे ६ ते १४ वयोगटातील सर्वच बालके ...
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावरून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तथापि, विविध कारणांमुळे ६ ते १४ वयोगटातील सर्वच बालके शिक्षणाच्या प्रवाहात येत नसल्याचे दिसून येते. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आता शिक्षण विभागाने ‘मिशन वीटभट्टी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील वीटभट्ट्यांवर कर्मचारी व बालरक्षकांची चमू जाऊन शाळाबाह्य बालकांचा शोध घेत आहेत. या वीटभट्ट्यांवर तसेच अन्य ठिकाणी शाळाबाह्य बालके काम तर करीत नाहीत ना, शाळेत न येण्याची कारणे आदींबाबत माहिती जाणून घेतली जात आहे. ९ व १२ फेब्रुवारीदरम्यान ही शोधमोहीम राबविण्यात येत आहे. कधीच शाळेत न गेलेले विद्यार्थी, सतत तीस दिवस गैरहजर बालक, शिक्षणात मध्येच खंड पडलेले, स्थलांतरित आदी प्रकारातील बालकांची शोधमोहीम राबविण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता स्वत:ची आरोग्यविषयक काळजी घेऊन वीटभट्टी, भटके कुटुंब, बांधकाम क्षेत्र तसेच भिक्षा मागणारे कुटुंब, रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड याठिकाणी शोधमोहीम राबविण्यात येत आहे.