कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मदतीचा ओघ ओसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:43 AM2021-04-23T04:43:58+5:302021-04-23T04:43:58+5:30
मालेगांव : मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये गावखेड्यापर्यंत सर्वांनी मदतीचा हात पुढे केला; परंतु यंदा कुणीच कुणाला मदत करताना दिसत नाही. ...
मालेगांव : मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये गावखेड्यापर्यंत सर्वांनी मदतीचा हात पुढे केला; परंतु यंदा कुणीच कुणाला मदत करताना दिसत नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मदतीचा ओघ ओसरला असल्याचे चित्र मालेगाव तालुक्यात दिसून येत आहे.
मागील लॉकडाऊनमध्ये राजकीय पक्ष, सामाजिक संघटनेचे शेकडो कार्यकर्ते व समाजातील दानशूर नागरिकांनी गोरगरीब, गरजू, विधवा, परितक्त्यांना अन्नधान्य, तेल, तिखट, मीठ, तांदूळ, साखर, पीठ, तूरडाळ, आदी विविध वस्तू वाटप केल्या होत्या. कुणीही उपाशी राहू नये, यासाठी सर्वजण काळजी घेत होते. मात्र, यंदा संचारबंदीत कोरोनामुळे गोरगरीब, मजुरांकडे पैसे नसताना त्यांना मदतीचा हात देण्यास कुणीही पुढे येत नसल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागातील लोकांना आता दोन वेळच्या जेवणाची समस्या भेडसावत आहे. दुसरीकडे पोटाचा प्रश्न भेडसावत आहे. मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना मदत करून फोटो सेशन करणाऱ्यांनी यंदा मदतीचा हात आखडता घेतला आहे. मागच्या वर्षी गोरगरिबांना दिलेले धान्य आताही त्यांच्याकडून संपले नसावे, असा धान्य देणाऱ्यांचा समज झालेला असावा, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मागील लॉकडाऊनमध्ये केंद्र व राज्य सरकारने शिस्तबद्धरीत्या तालुक्यातील गावागावांत नागरिकांना मदतीचा हात दिला. सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला होता; मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गरजवंतांना खरी मदतीची गरज आहे.
इनबॉक्स
राजकीय, सामाजिक संघटना, कार्यकर्ते गेले कुठे?
गेल्यावर्षी कोरोना काळात अनेक सामाजिक संघटना व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गरजवंतांना मदत केली. मात्र, काहींनी केवळ फोटोसेशनपुरतीच मदत केली. त्यांनी मदत केल्याचा प्रचंड आव आणला. काही सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी मात्र प्रामाणिकपणे मदत केली. अनेकांनी या मदतीचा थांगपत्ताही लागू दिला नाही. यावर्षी पुन्हा कोरोनाने आक्रमण केले आहे. अशा वेळी मदत करणाऱ्या प्रामाणिक सामाजिक संघटना व कार्यकर्त्याची नितांत गरज आहे. मात्र, सर्व संघटना व कार्यकर्ते गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
इनबॉक्स
कुटुंबाना मानसिक आधाराची गरज
सध्याच्या या भयानक परिस्थितीत अनेकजण कोरोनाबाधित होत आहेत. शेजारचे लोक कोरोनाबाधित आल्याचे समजल्यावर दूर जात आहे. अशा वेळी आर्थिक मदत नाही, तर मानसिक आधाराची गरज आहे. किमान मदत नाही, तर मानसिक आधार द्यावा, असे मत व्यक्त होत आहे.