विहिरीसाठी ४९० लाभार्थींची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 02:48 PM2019-11-29T14:48:28+5:302019-11-29T14:48:47+5:30
लाभार्थींना विहित मुदतीत विहिर बांधकाम पूर्ण केल्यानंतर अनुदानाचा संपूर्ण लाभ मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंंतर्गत सन २०१९-२० या वर्षात प्राधान्यक्रम व ईश्वरचिठ्ठीतून ४९० लाभार्थींची सिंचन विहिरीसाठी निवड झाली आहे. या लाभार्थींना विहित मुदतीत विहिर बांधकाम पूर्ण केल्यानंतर अनुदानाचा संपूर्ण लाभ मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रल्हाद शेळके यांनी गुरूवारी दिली.
अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करून जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टिकोनातून विशेष घटक योजना सुधारीत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येत आहे. नवीन सिंचन विहीर तसेच सिंचन साहित्याचा लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. जिल्ह्यात एकूण १४२० अर्ज प्राप्त झाले होते. छाननीअंती ९५५ अर्ज पात्र ठरले असून प्राधान्यक्रमाने २१५ व ईश्वरचिठ्ठीतून २७५ अशा एकूण ४९० लाभार्थींची निवड झाली आहे.
मालेगाव तालुक्यातून एकूण २२९ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीअंती १५९ अर्ज पात्र ठरले असून प्राधान्यक्रमाने ३६ व ईश्वरचिठ्ठीतून ४८ अशा एकूण ८४ लाभार्थींची निवड झाली आहे. रिसोड तालुक्यातून एकूण २८१ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीअंती १५९ अर्ज पात्र ठरले असून प्राधान्यक्रमाने २९ व ईश्वरचिठ्ठीतून ५७ अशा एकूण ८६ लाभार्थींची निवड झाली आहे. मंगरूळपीर तालुक्यातून एकूण ३९५ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीअंती २७२ अर्ज पात्र ठरले असून प्राधान्यक्रमाने ६७ व ईश्वरचिठ्ठीतून ३० अशा एकूण ९७ लाभार्थींची निवड झाली आहे. कारंजा तालुक्यातून एकूण २१६ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीअंती १५८ अर्ज पात्र ठरले असून प्राधान्यक्रमाने २९ व ईश्वरचिठ्ठीतून ७६ अशा एकूण १०५ लाभार्थींची निवड झाली आहे. वाशिम तालुक्यातून एकूण १९४ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीअंती १३४ अर्ज पात्र ठरले असून प्राधान्यक्रमाने ३४ व ईश्वरचिठ्ठीतून ३८ अशा एकूण ७२ लाभार्थींची निवड झाली आहे. मानोरा तालुक्यातून एकूण १०५ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीअंती ७३ अर्ज पात्र ठरले असून प्राधान्यक्रमाने २० व ईश्वरचिठ्ठीतून २६ अशा एकूण ४६ लाभार्थींची निवड झाली आहे. निवड झालेल्या लाभार्थींना सिंचन विहीर व सिंचन साहित्यासाठी जवळपास २.८० लाखांचे अनुदान मिळणार आहे.