नाट्यमय घडामोडीनंतर सभापती-उपसभापतींची निवड
By admin | Published: October 1, 2015 01:06 AM2015-10-01T01:06:17+5:302015-10-01T01:06:17+5:30
वाशिम बाजार समितीच्या सभापतिपदी गोटे तर उपसभापतीपदी मापारी.
वाशिम : स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या ३0 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या निवडणुकीत बाजार समितीचे माजी सभापती नारायणराव गोटे पुन्हा सभापतिपदी विजयी झाले. उपसभापतिपदी गोटे पॅनेलचच सुरेश मापारी हे निवडून आले. प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटणी यांनी व्यापारी प्रतिनिधी आनंद चरखा व रमेशचंद्र लाहोटी यांना नारायणराव गोटे यांच्या बाजूने मतदान करायला लावून दिग्गजांना मात दिली. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर जिल्हावासीयांचे लक्ष लागलेल्या बाजार समिती सभापती-उपसभापतींची निवड झाली. कृषिउत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सकाळी ११.१५ वाजता सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी सभापतिपदासाठी नारायणराव गोटे यांनी, तर देशमुख ठाकरे गटाच्यावतीने डॉ.जगदीश दहात्रे यांनी नामांकन दाखल केले. उपसभापतिपदासाठी गोटे पॅनेलच्यावतीने सुरेश काशीराम मापारी व आनंद चरखा यांनी, तर देशमुख ठाकरे गटाच्या नंदा सुभाष नानवटे यांनी नामांकन दाखल केले होते. उपसभापतिपदासाठी शेतकरी मतदारसंघातूनच विजयी ठरलेला उमेदवार पात्र ठरत असल्यामुळे आनंद ओमप्रकाश चरखा यांचा अर्ज रद्द करण्यात आला. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू झाली. यावेळी नारायणराव गोटे व सुरेश मापारी यांच्याकडून दहा संचालक उभे राहिले असता, सभापतिपदाचे दुसरे उमेदवार डॉ. जगदीश दहात्रे यांनी हरकत घेऊन गुप्त मतदानाची मागणी केली. त्यानुसार गुप्त मतदान घेण्यात आले. गुप्त मतदान प्रक्रियेच्या निकालात सभापतिपदाचे उमेदवार नारायणराव गोटे यांना ११ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. जगदीश दहात्रे यांना केवळ सात मते मिळाली. उपसभापतिपदाचे उमेदवार सुरेश मापारी यांनी १0 मते, तर त्यांचे प्रतिस्पर्धी नंदाताई सुभाष नानवटे यांना फक्त आठ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी.जी. पवार यांची, तर सहायक म्हणून ए.बी.भोयर, बी.एन. गोदमले व एम.एम. राठोड यांनी काम पाहिले.