ग्रामीण कृषी पर्यटनातून स्वयंरोजगार निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:40 AM2021-05-14T04:40:26+5:302021-05-14T04:40:26+5:30
वाशिम : ग्रामीण भागातील युवक मोठ्या प्रमाणात कृषी पदवीधर होत आहेत; परंतु त्यांच्यापुढे रोजगाराची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण ...
वाशिम : ग्रामीण भागातील युवक मोठ्या प्रमाणात कृषी पदवीधर होत आहेत; परंतु त्यांच्यापुढे रोजगाराची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्रामीण युवकांना स्वयंरोजगार मिळावा व तसेच ग्रामीण शेती पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल व्हावे या हेतूने कृषी विज्ञान केंद्र वाशिमच्या वतीने १३ मे रोजी आभासी पद्धतीने कृषी पर्यटनातून स्वयंरोजगार याविषयी प्रशिक्षण घेण्यात आले.
या प्रशिक्षणाकरिता कृषी विज्ञान केंद्र वाशिमचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. रवींद्र काळे मार्गदर्शक म्हणून लाभले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून विभागप्रमुख डॉ. वनिता खोबरेकर तसेच कृषी महाविद्यालय नागपूर येथून सहयोगी प्राध्यापक डॉ. उमाकांत डांगोरे, मार्गदर्शक म्हणून कृषी अर्थशास्त्र विभागाचे विषय विशेषज्ञ डिगांबर इंगोले हे होते.
अध्यक्षीय भाषणामध्ये डॉक्टर काळे यांनी कृषी महाविद्यालयातून बाहेर पडत असलेल्या ग्रामीण युवक व युवतींनी कृषी पर्यटनाची संकल्पना समजून पुढे येण्याचे आवाहन केले. तसेच यावेळी कृषी पर्यटनाकरिता लागणाऱ्या महत्त्वाच्या बाबी, जागेची निवड, शहरी भागातील लोकांची अपेक्षा व या प्रकल्पाला लागणारे भांडवल व त्यातून मिळणारे उत्पन्न याविषयी सादरीकरण करून शेतीची योग्य उभारणी करून एक चांगल्या प्रकारचे उत्पन्नाचे साधन शेतकऱ्यांना मिळू शकते व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याकरितासुद्धा मदत होईल, असे मत मांडले.
विभागप्रमुख डॉ. वनिता खोबरकर यांनी कृषी विज्ञान केंद्राने उभारलेल्या छोट्या कृषी पर्यटनाबद्दल प्रशंसा करून लहान शेतकऱ्यांनी त्याचे अनुकरण करावे याविषयी मार्गदर्शन केले.
इंगोले यांनी मागील पाच वर्षांपासून कृषी विज्ञान केंद्र राबवित असलेल्या एकात्मिक शेती पद्धतीची सांगड कृषी पर्यटनामध्ये करून अनेक ग्रामीण युवकांना कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेती व शेतीशी निगडित उद्योगाबाबत माहिती देण्याचे कार्य करीत आहोत याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. उमाकांत डांगोरे यांनी आजच्या काळात शेती ही उपजीविकेचे साधन म्हणून न पाहता तो एक व्यवसाय म्हणून करावा जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल याविषयी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या शेवटी कोरोना संसर्गाच्या काळात घ्यावयाची काळजी याबाबत एस. आर. बावस्कर यांनी आपल्या सादरीकरणातून संदेश देऊन सर्व उपस्थितांचे आभार मानले.