जीवनावश्यक वस्तूंची जास्त भावाने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:40 AM2021-05-14T04:40:24+5:302021-05-14T04:40:24+5:30
कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने १५ मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. असे असले ...
कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने १५ मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. असे असले तरी नागरिकांना किराणा, दूध, भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये, यासाठी पार्सल सुविधेला परवानगी दिलेली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा अजिबात तुटवडा भासू नये, यासाठी सरकार विशेष खबरदारी घेत आहे. असे असले तरी तालुक्यातील काही दुकानदारांकडून किराणा सामानासह जीवनावश्यक वस्तूंची जास्त दराने विक्री केल्या जात असल्याचे दिसून येते. संपूर्ण देश एका भयानक संकटात सापडलेला असताना व प्रत्येक जण आपला जीव वाचविण्यासाठी धडपडत असताना या माणुसकीशून्य दुकानदारांवर जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य कार्यवाही करून यांचे व्यवसाय परवाने रद्द करण्यात यावेत, शिवाय यांचे गोडाऊन तपासून साठेबाजीची शहानिशा करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. कडक निर्बंधाचे नियमसुद्धा काही जण पाळत नसून नियम पाळणाऱ्या प्रामाणिक नागरिकांची मात्र कोंडी होत आहे. एकीकडे काही दुकानदार अव्वाच्या सव्वा दराने वस्तूंची विक्री करून नफा मिळवत असतांना मजूर, कामगार व लघु व्यावसायिक मात्र आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत.