कोरोना लसीकरणात ज्येष्ठ नागरिक आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:37 AM2021-07-26T04:37:28+5:302021-07-26T04:37:28+5:30
कोरोना संसर्गाची पहिली लाट ओसरली असतानाच जिल्ह्यात १५ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला आरोग्य विभागाने सुरूवात केली. त्यात फ्रंट लाईन कोरोना ...
कोरोना संसर्गाची पहिली लाट ओसरली असतानाच जिल्ह्यात १५ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला आरोग्य विभागाने सुरूवात केली. त्यात फ्रंट लाईन कोरोना योद्ध्यांना प्राधान्य देण्यात आले, त्यानंतर ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर ४५ वर्षे वयोगट आणि नंतर १८ ते ४५ असे लसीकरण सुरू करण्यात आले. जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत एकूण निर्धारित १३ लाख ७४ हजार ७३५ लसीकरण उद्दिष्टाच्या तुलनेत २५ जुलैपर्यंत ४ लाख ५३ हजार २५१ लोकांचे लसीकरण झाले असून, हे प्रमाण ३३ टक्के आहे. यात निर्धारित उद्दिष्टानुसार ६० वर्षे वयावरील ७२ टक्के नागरिकांचे, ४५ ते ५९ वयोगटातील ३४ नागरिकांचे, तर १८ ते ४५ वर्षे वयोगटातील केवळ १८ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण होऊ शकले आहे.
---------
आरोग्य सुरक्षेसाठी ज्येष्ठांचा प्रतिसाद
जिल्ह्यात लसीकरण मोहिमेतंर्गत ६० वर्षे वयावरील गटात ७२ टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. क्षीण झालेली प्रतिकार शक्ती आणि वारंवार उद्भवणाऱ्या आरोग्याच्या तक्रारीमुळे ज्येष्ठ नागरिक कोरोना प्रतिबंधक लस घेऊन आरोग्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या उलट युवावर्ग मात्र अधिक प्रतिकारशक्तीच्या विश्वासापोटी लस घेण्यात उत्सुक नसल्याचे काहींच्या प्रतिक्रियेवरून कळले आहे.
-----------
लसीकरणासाठी नागरिकांना आवाहन
लसीकरणासाठी हेल्थकेअर वर्कर, फ्रन्टलाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक पुढे येत आहेत. १८ ते ५९ वर्षे वयोगटातील नागरिकांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्यावतीने वारंवार सांगितले जात आहे. काही सूज्ञ नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन लसीकरण करून घेतले. दरम्यान, कोविडचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये, यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत.
----------------
कोट: जिल्ह्यात आवश्यक प्रमणात लसींचे डोस उपलब्ध असून, १५६ लसीकरण केंद्रांवर नियमित कोरोना लसीकरण केले जात आहे. १८ वर्षे व त्याहून अधिक वय असलेल्या प्रत्येक नागरिकाने या लसीकरणाचा लाभ घेऊन स्वत:सह समाजाच्या सुरक्षेत हातभार लावावा.
-डॉ. मधुकर राठोड,
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम
---
वयोगटानुसार उद्दिष्ट व लसीकरण
१८ ते ४५ वयोगट उद्दिष्ट
६,५८,०००
झालेले लसीकरण
१,१६,३०० (१८ टक्के)
--------------
४६ ते ५९ वयोगट उद्दिष्ट
४६०७००
झालेले लसीकरण
१,५६,६९८ (३४ टक्के)
--------------
६० पेक्षा अधिक वयोगट उद्दिष्ट
१८४,९५०
झालेले लसीकरण
२,५५,७५५ (७२ टक्के)
---------