निवासी शाळांत डे-स्कॉलर, निवासी मुलांच्या वर्ग व्यवस्थेचे विभक्तीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:48 AM2021-03-01T04:48:36+5:302021-03-01T04:48:36+5:30
आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा कोरोना (कोविड-१०) विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आल्या होत्या. तद्नंतर २० नोव्हेंबर २०२० ...
आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा कोरोना (कोविड-१०) विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आल्या होत्या. तद्नंतर २० नोव्हेंबर २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळांतील ९ ते १३ वी पर्यंतच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच ५ फेब्रुवारी २०२१ च्या शासन निर्णयान्वये १५ फेब्रुवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे या विभागांतर्गत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने उपरोक्त दोन्ही शासन निर्णयान्वये दिलेल्या मार्गदर्शन सूचना व्यतिरिक्त आणखी सविस्तर मार्गदर्शक सूचना शासनाने २६ फेब्रुवारीला निर्गमित केल्या आहेत. यात प्रामुख्याने निवासी व डे-स्कॉलर विद्यार्थ्यांचा परस्परांशी संपर्क आल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे वर्ग वेगवेगळे व वेगवेगळ्या वेळेत भरविण्याच्या सूचनेचा समावेश आहे. त्यात दुपारी १.३० ते २ या काळात डे-स्कॉलर विद्यार्थी बसलेल्या वर्गांचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. निवासी विद्यार्थ्यांचे दुपारचे जेवण १.३० वाजतापूर्वी उरकण्यात यावे. शाळा सुटल्यानंतर डे-स्कॉलर विद्यार्थ्यांना थेट घरी जाण्यासंबंधी सूचना द्याव्यात. कोणत्याही परिस्थितीत निवासी व डे-स्कॉलर विद्यार्थ्यांचा संपर्क टाळणे ही जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी काटेकोरपणे पाळण्याचेही २६ फेब्रुवारीच्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
-----
शिक्षकांची कोविड व्यवस्थापक म्हणून नियुक्ती
आदिवासी विकास विभागांतर्गत निवासी शाळांत कामकाजाच्या वेळेत २ शिक्षकांची कोविड व्यवस्थापक म्हणून महिनाभरासाठी मुख्याध्यापकांकडून नियुक्ती करण्यात येणार असून, महिनाभराचा कालावधी संपल्यानंतर दुसऱ्या दोन शिक्षकांची नियुक्ती याच पदावर केली जाणार आहे. हे शिक्षक शाळेत शासनाच्या परिपत्रकातील नमूद सूचनांचे पालन काटेकोरपणे होत असल्याची खबरदारी घेणार आहेत.
---
इतर सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना
शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेचा परिसर स्वच्छ करून सोडियम हायड्रोक्लोराईडने निर्जंतुक करणे, शाळेत थर्मल स्क्रिनिंगसाठी पल्स ऑक्सिमिटर, थर्मामीटर उपलब्ध करणे, नवीन वर्ग सुरू करण्यापूर्वी निवासी विद्यार्थ्यांची कोविड-तपासणी करणे, दर दिवशी विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनिंग करणे बंधनकारक असतानाच आसन व्यवस्था आणि सर्व खोल्या रोज निर्जंतुक करणे, डे-स्कॉलर विद्यार्थी शाळेत आल्यानंतर त्यांना नळावर हातपाय स्वच्छ धुवून, तोंडाला मास्क लावून व हात सॅनिटाईझ करूनच वर्गात प्रवेश देणे, शाळेच्या मुख्य कमानीजवळ डे-स्कॉलर विद्यार्थ्यांसाठी नळ बसविणे, या सूचनाही देण्यात आल्या आहेत.