१५-२० वर्षे सेवा दिली; केंद्रप्रमुखपदी पदोन्नती केव्हा?; शिक्षक संघटना आक्रमक
By संतोष वानखडे | Published: January 10, 2024 05:54 PM2024-01-10T17:54:05+5:302024-01-10T17:54:18+5:30
विविध प्रश्न प्रलंबित
वाशिम : शैक्षणिक क्षेत्रात १५ ते २० वर्ष सेवा दिली, त्याऊपरही केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी (शिक्षक ) पदावर पदोन्नती मिळाली नसल्याने शिक्षक संघटना आक्रमक झाल्या. बुधवारी (दि.१० ) शिक्षक कृती समितीच्यावतीने वाशिम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
१२ जानेवारी २०२४ रोजी मॉ जिजाऊ जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली. विद्यार्थ्यांना व प्राथमिक शिक्षकांना जयंतीनिमित्त प्रत्यक्ष सिंदखेडराजा येथे उपस्थित राहता येईल व मानवंदना देता येईल तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा माँ जिजाऊ जन्मस्थळाची माहिती होईल. केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी यांची पदे पदोन्नतीने भरण्यात यावी, वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी पात्र शिक्षकांना त्वरित लागू करावी, थकित बिलाचे एरियर्स, भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या, वैद्यकीय परिपूर्ती देयके इत्यादी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन व माँ जिजाऊ जयंती निमित्त सुट्टी देण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ अशी ग्वाही उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांनी शिष्टमंडळाला दिली. शिस्टमंडळात वाशिम जि.प.शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय इढोळे, पतसंस्थेचे उपाध्यक्ष तथा अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय मनवर, संचालक रा.सु.इंगळे जगन्नाथ आरु, प्रशांत वाझुळकर, अजयकुमार कटके ,संतोष बांडे ,किशोर जुनघरे ,पुरुषोत्तम तायडे, छत्रगुघ्न गवळी, संतोष खोडे, सुनील इंगोले, चंद्रमनी इंगोले, गजानन शेळके, राष्ट्रवादी शिक्षक संघटना व अखिल भारतीय शिक्षक संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.