वाशिम जिल्ह्यात सोयाबीनच्या सुडयांना आग लावण्याचे सत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 05:29 PM2017-10-30T17:29:42+5:302017-10-30T17:30:44+5:30
वाशिम : शेतकरी यंदा निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे आधीच अडचणीत असताना त्यान मानवनिर्मित संकटांचीही भर पडत असल्याचे दिसत आहे. अल्प पावसामुळे हाती आलेले थोडेफार सोयाबीन शेतकºयांनी सोंगून शेतात ठेवले आहे. या सोयाबीनच्या सुड्यांना अज्ञात इसमांकडून आग लावण्याचे प्रकार होत आहेत. जिल्ह्यात गत १५ दिवसांत अशा ६ घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी धास्तावले असून, या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करणे गरजेचे झाले आहे.
यंदा अल्प पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यातच परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे अधिक नुकसान झाले असून, अनेक शेतकºयांना या पावसामुळे सोयाबीन काढण्यास विलंब लागला. आता शेतकºयांनी हे सोयाबीन सोंगून ठेवले असून, बाजारात अपेक्षीत भाव मिळण्याच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. त्यामुळे सोयाबीन काढणीची अनेकांनी घाई केली नाही. सोंगून ठेवलेल्या सोयाबीनच्या सुड्या शेतात लावण्यात आल्या आहेत. या सोयाबीनच्या सुड्यांना अज्ञात इसमांकडून आग लावण्याचे प्रकार होत आहेत. वाशिम तालुक्यात अशा तीन घटना घडल्या असून, त्यामध्ये २७ आॅक्टोबर रोजी पार्डी आसरा येथील घटनेचा समावेश आहे. त्याशिवाय, कारंजा, मानोरा आणि मालेगाव तालुक्यातही अशा घटना घडल्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे शेतकरी धास्तावले असून, रात्रीच्या वेळी ते सोयाबीन सुड्यांची राखण करीत शेतात जागत आहेत. या प्रकाराची पोलीस प्रशासनाने दखल घेऊन अशा घटनांमागे सक्रीय असलेल्या लोकांना लवकर पकडून त्यांना कठोर शासन करण्याची गरज आहे.