ग्रामपंचायत स्तरावर १० बेडच्या कोविड सेंटरची उभारणी करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:39 AM2021-05-24T04:39:32+5:302021-05-24T04:39:32+5:30
वाशिम : दुसऱ्या लाटेत वाशिम जिल्ह्यात मे महिन्यात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. ...
वाशिम : दुसऱ्या लाटेत वाशिम जिल्ह्यात मे महिन्यात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर सरकारी कार्यालयाच्या इमारतीत किमान १० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवकांना शनिवारी (दि.२२ मे) दिले. यासाठी १५ व्या वित्त आयोगातून निधीची तरतूद करण्याच्या सूचनाही दिल्या.
दुसऱ्या लाटेत ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांनादेखील संसर्ग झाला आहे. युवकदेखील कोरोनाला बळी पडले. ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासन, ग्रामस्तरीय समितीने अधिक सतर्क राहणे आवश्यक असून, गावातच शासकीय इमारतीमध्ये किमान १० बेडचे कोविड केअर सेंटर उभारावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. व मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दिले. पाण्याची व्यवस्था, शौचालय, पंखा अशा सुविधा असणाऱ्या इमारती संस्थात्मक विलगीकरणासाठी निश्चित कराव्यात. आवश्यकतेप्रमाणे १५ व्या वित्त आयोगातून पाण्याची व्यवस्था, शौचालय, पंखा अशा सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. ज्या व्यक्तींना ताप, खोकला, अशक्तपणा, सर्दी, हगवण, मधुमेह, फुप्फुसांचे आजार, श्वसनास त्रास यांसारखी लक्षणे आढळून आल्यास तातडीने नजीकच्या आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी करावी, अशा सूचनाही प्रशासनाने केल्या.
००००००००००