सव्वाशे शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा प्रश्न निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 05:35 PM2018-12-22T17:35:30+5:302018-12-22T17:36:21+5:30
देपूळ (वाशिम): येथून जवळच असलेल्या वारा जहॉगिर प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात शेतरस्ता गेल्याने १३० शेतकऱ्यांची शेतीच अडचणीत आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
देपूळ (वाशिम): येथून जवळच असलेल्या वारा जहॉगिर प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात शेतरस्ता गेल्याने १३० शेतकऱ्यांची शेतीच अडचणीत आली होती. या संदर्भात शासन, प्रशासनदरबारी पाठपुरावा केल्यानंतर अखेर पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या समस्येची दखल घेत शेतकऱ्यांसाठी पर्यायी रस्त्याचे काम सुरू केले आहे.
वारा जहॉगिर येथे २०१५ मध्ये पाटबंधारे विभागाच्यावतीने लघू प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा देपूळ ते पार्डी रस्ता बुडित क्षेत्रात गेला. त्यामुळे १३० शेतकºयांची हजारो एकर शेती संकटात सापडली. शेतीत शेतमाल, शेती अवजारे आणि इतर साहित्याच्या वाहतुकीसाठी बैलगाडी, ट्रॅक्टर ही वाहने नेणेच शेतकºयांना अशक्य झाले. परिणामी अनेकांची शेती पडित राहू लागली होती. पाटबंधारे विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनी या रस्त्यासाठी नियोजन न केल्याने शेतकरी संकटात सापडले होते. त्यानंतर शेतकºयांनी बुडित क्षेत्रात गेलेल्या रस्त्यासाठी पर्यायी रस्ता देण्याच्या मागणीसाठी वेळोवेळी पाटबंधारे विभागाचे उंबरठे झिजविले, जिल्हाधिकाºयांसह प्रशासन दरबारीही निवेदन दिले. त्यानंतर पाटबंधारे विभागाचे विद्यमान कार्यकारी अभियंता एस. डी. जाधव यांनी या रस्त्यामुळे होत असलेली शेतकºयांची अडचण लक्षात घेतली आणि रस्त्याच्या कामासाठी सुधारीत प्रशासकीय मान्यतेची तरतूद केली. तथापि, सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने रस्त्याचे कामही रखडणार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या संदर्भात पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा करीत वरिष्ठस्तरावरून रस्ता कामासाठी परवानगी घेत निविदा प्रक्रिया पूर्ण केली. आता या रस्त्याचे कामही सुरु झाले असून, या रस्त्यामुळे परिसरातील १३० शेतकºयांच्या शेती वहितीचा प्रश्न निकाली लागला आहे.