जिल्हाभरात होणार सात-बाराचे चावडी वाचन!
By admin | Published: May 7, 2017 02:07 AM2017-05-07T02:07:15+5:302017-05-07T02:07:15+5:30
प्रशासनाची विशेष मोहीम : १ ऑगस्टपर्यंंत विविध उपक्रमांचे आयोजन
वाशिम : "ई महाभूमी" या प्रकल्पांतर्गत अचूक संगणकीकृत गाव नमुना नंबर सात-बारासाठी जिल्हाभरात १ ऑगस्टपर्यंंंत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याची सुरुवात महाराष्ट्र दिनापासून करण्यात आली. याअंतर्गत शेतकर्यांना डिजिटल स्वाक्षरीत तथा संगणकीकृत सात-बारा मिळवून देण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी शनिवार, ६ मे रोजी दिली.
या उपक्रमांतर्गत १ ते १५ मे २0१७ या कालावधीत शेतकर्यांनी आपला संगणकीकृत गाव नमुना नंबर सात-बारा अचूक असल्याची खात्री करण्यासाठी या संकेतस्थळास भेट द्यावी. यासंदर्भात काही आक्षेप असल्यास गावातील तलाठय़ांशी संपर्क साधून चुकीची दुरुस्ती करून घेण्याबाबत जनजागृती केली जात आहे. पुढच्या टप्प्यात १५ मे ते १५ जून २0१७ या कालावधीत जिल्ह्यातील गावागावांमध्ये संगणकीकृत गाव नमुना नंबर सात-बाराचे चावडी वाचन होणार आहे. शेतकर्यांसंबंधीच्या या महत्त्वपूर्ण दस्तावेजात कुठल्याच्या त्रुटी राहू नयेत, यासाठी या उपक्रमादरम्यान त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. १६ जून ते ३१ जुलै २0१७ या कालावधीत सात-बारासंबंधी प्राप्त आक्षेपांचा विचार करून आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाची विशेष चमू कार्यरत राहील, असे निवासी उपजिल्हाधिकार्यांनी सांगितले. हे सर्व उपक्रम जिल्हाभरात यशस्वीरीत्या राबविल्यानंतर १ ऑगस्टपासून शेतकर्यांना डिजिटल स्वाक्षरीत संगणकीकृत गाव नमुना नंबर सात-बारा उपलब्ध करून दिला जाईल, असेही ते म्हणाले. तथापि, प्रशासनाने हाती घेतलेल्या या उपक्रमात जिल्ह्यातील शेतकर्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे.