अज्ञात तापाने सात वर्षाच्या मुलीचा मृत्यू
By admin | Published: September 17, 2014 01:23 AM2014-09-17T01:23:16+5:302014-09-17T01:23:16+5:30
दोन चिमुकल्यांवर अकोल्यात उपचार सुरु.
जउळका रेल्वे (वाशिम) : येथून जवळच असलेल्या ग्राम माळेगाव येथील एका सात वर्षीय मुलीचा अज्ञात तापाने मृत्यू झाल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी घडली. दरम्यान दोन चिमुकल्यांवर अकोल्यात आजघडीला उपचार सुरु असल्याची माहिती आहे.
ग्राम माळेगाव येथील सदानंद लोखंडे यांची ७ वर्ष वयाची लक्ष्मी उर्फ स्वप्नाला अचानक ताप आली. चार दोन दिवसातच आलेल्या या तापेने लक्ष्मीचा अचानक १५ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. या मुलीच्या आकस्मिक मृत्यूने माळेगावातील अज्ञात तापेच्या साथीचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेतही आजारपणामुळे विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड रोडावली आहे. गावात आरोग्यसेवकांनी दोनवेळा फेरफटका मारला असला तरी गावातील तापेची साथ नियंत्रणात आणण्यासाठी पथक पाटविण्यासह गावकर्यांची आरोग्य तपासणी व रक्त तपासणी करुन उपचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
गावातील श्रीकृष्ण बबन झ्याटे व जानव्ही संतोष आंबेकर हे दोन चिमुकले अकोल्याच्या क्रीटीकल केअर सेंटरमध्ये उपचार घेत असून आरोग्य यंत्रणा मात्र गावकर्यांच्या आरोग्याविषयी दक्ष नसल्याचे चित्र आहे.
**अमानीत आढळला डेंग्यु सदृष्य रूग्ण
अमानी : येथे प्रत्येक घरात तापेची साथ पसरली आहे. १६ सप्टेंबर रोजी डेंग्यु सदृष्य रूग्ण आढळल्याने येथील जि.प. सदस्या जाधव यांनी आरोग्य विभागाशी चर्चा केली. येथे आलेल्या पथकाने घरोघरी जावून रूग्णांची पाहणी केली. डेग्युसदृष्य रूग्णावर अकोला येथे उपचार सुरू आहेत.