रस्त्यावर वाहत आहे सांडपाणी, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:43 AM2021-04-02T04:43:26+5:302021-04-02T04:43:26+5:30
मानोरा तालुक्यातील आसोला खुर्द येथील लोकसंख्या सात हजारांच्या जवळपास आहे. या सर्व ग्रामस्थांच्या आरोग्याची निगा राखणे ग्रामपंचायत प्रशासनाचे आद्यकर्तव्य ...
मानोरा तालुक्यातील आसोला खुर्द येथील लोकसंख्या सात हजारांच्या जवळपास आहे. या सर्व ग्रामस्थांच्या आरोग्याची निगा राखणे ग्रामपंचायत प्रशासनाचे आद्यकर्तव्य आहे. मात्र ग्रामसेवक येथे हजेरी लावत नसल्याने विविध समस्यांनी तोंड वर काढले आहे. गावातील नाल्यांची स्वच्छता करण्यात आली नसल्याने घाणीने भरलेल्या नाल्यांतील सांडपाणी मुख्य रस्त्यावर येत आहे. परिणामी, रस्त्यावर गटार साचले आहे. या गटारामुळे दुर्गंधी पसरली असून, जंतूसंसर्गाची भीती आहे. शिवाय रस्त्याची दुरवस्थाही होत असून, डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे मलेरिया, डायरिया आदी आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात सोहमनाथ महाराज संस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे येणाऱ्या भाविक-भक्तांना मंदिरात जाण्यात अडचणी येत आहेत. येथील ग्रामसेवक गावात नियमित येत नसल्याने गावातील अनेक समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे गाव विकास थांबला आहे. शिवाय विविध कामांसाठी अनेकदा येथील ग्रामस्थांना ग्रामसेवकाकडे काम पडते म्हणून कित्येकदा ग्रामस्थ व घरकुल लाभार्थी ग्रामसेवकांची प्रतीक्षा करीत बसतात. दिवसभर प्रतीक्षा करूनही ग्रामसेवक गावात न आल्यास त्यांना निराशेने घरी परतावे लागते. त्यामुळे ग्रामसेवकांवर कारवाई करावी, अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी केली आहे.