शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेज रुपांतरसाठी मिळणार भरीव निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 03:37 PM2019-07-07T15:37:04+5:302019-07-07T15:37:10+5:30
वाशिम : अचलपूर-यवतमाळ या नॅरोगेज रेल्वेमार्गावर धावणाऱ्या शंकुतला रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज लोहमार्गामध्ये रुपांतर करण्याची बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने घेतली असून यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश राज्याच्या प्रधान सचिवांना दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अचलपूर-यवतमाळ या नॅरोगेज रेल्वेमार्गावर धावणाऱ्या शंकुतला रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज लोहमार्गामध्ये रुपांतर करण्याची बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने घेतली असून यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश राज्याच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेज मार्गासाठी भरीव निधी मिळण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटणी यांनी दिली.
नॅरोगेज मार्गावरून धावणारी शकुंतला रेल्वे गेल्या दीड वर्षांपासून बंद आहे. नॅरोगेजचे रुपांतर ब्रॉडगेजमध्ये झाल्यास ही रेल्वे पुन्हा धावू शकते. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून २१४७.४४ कोटी रुपयांच्या निधीस मंजूरी प्राप्त आहे. त्याचा ५० टक्के अर्थात १०७३ कोटी रुपये राज्यशासनाने उपलब्ध करून द्यावयाचे आहेत. तसा प्रस्ताव मुंबई मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांनी राज्यशासनाकडे यापुर्वीच पाठविला असून त्यास शासनाने मंजूरी द्यावी, अशी मागणी आमदार पाटणी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी हा विषय गंभीरतेने घेवून २८ जून रोजी राज्याचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंग यांना पत्र पाठवून निधी मंजूरीच्या प्रस्तावावर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. यायोगे निधी मिळण्याचा मार्ग बहुतांशी मार्गी लागल्याची माहिती आमदार पाटणी यांनी दिली.
दीड वर्षांपासून शकुंतला रेल्वे बंद
इंग्रजांच्या राजवटीत सुरू झालेली शकुंतला रेल्वे नॅरोगेज मार्गावरून धावत असताना विविध स्वरूपातील समस्या निर्माण झाल्या होत्या. देखभाल-दुरूस्तीअभावी ही रेल्वे प्रवासादरम्यान बंद पडण्याचे प्रकारही वाढीस लागल्याने गेल्या दीड वर्षांपासून रेल्वेचा प्रवास बंद आहे.