शेलुबाजार चौक’ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी नागरिकांचा रास्ता रोको !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 03:16 PM2018-06-29T15:16:04+5:302018-06-29T15:18:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलुबाजार : मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील प्रमुख चौकातील अतिक्रमण व बेताल वाहतुकीचा २७ वर्षीय युवक बळी ठरला. या चौकाला अतिक्रमणमुक्त करणे आणि बेताल वाहतुक ताळ्यावर आणण्याच्या मागणीसाठी २९ जून रोजी दुपारच्या सुमारास नागरिकांना या चौकातच रास्ता रोको आंदोलन केले.
२८ जून रोजी एम.एच. ०४ एबी ५७२२ क्रमांकाच्या आयशर ट्रकने तपोवन येथील अजय येवले या युवकाला शेलुबाजार चौकात चिरडले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शेलुबाजार चौकात अतिक्रमण फोफावले आहे. रस्त्यालगतच खाजगी वाहने उभी राहतात. कुणी कोणत्याही बाजूने वाहन चालवित असल्याने पायदळ जाणाºया नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. अतिक्रमण व बेशीस्त वाहतुकीमुळे अजय येवले या युवकाला जीव गमवावा लागला. २९ जून रोजी त्याच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी शेलुबाजार चौकात रास्ता रोको आंदोलन करीत हा चौक अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी लावून धरली. या चौकातील बेशिस्त वाहतुक अपघातास कारणीभूत ठरत असल्याने हा चौक अतिक्रमणमुक्त करावा तसेच बेशिस्त वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.