शिरपूरचे शेतकरी सारडा यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव
By Admin | Published: July 12, 2017 01:37 AM2017-07-12T01:37:01+5:302017-07-12T01:37:01+5:30
प्रगतिशील शेतकरी सचिन दामोदर सारडा यांचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याहस्ते मुंबईत ११ जुलै रोजी गौरव करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : हळद आणि केळीचे विक्रमी उत्पादन घेणारे येथील प्रगतिशील शेतकरी सचिन दामोदर सारडा यांचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याहस्ते मुंबईत ११ जुलै रोजी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे शेतकरी सारडा यांच्याकडे १.६२ हेक्टर शेती आहे. त्यांनी ठिबक सिंचनचा वापर करीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केळी आणि हळद या पिकांचे विक्रमी उत्पादन घेतले. शेतात गांडुळ खत उत्पादक युनिटची उभारणी करून त्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब केला. नागपूर कृषी वसंत-२०१४ या कार्यक्रमात त्यांनी प्रमुख वक्ता म्हणून सहभाग नोंदवून हळद या पिकाबाबत इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. कृषी विज्ञान केंद्र, कुरडा येथे दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण, कृषी संशोधन केंद्र, वाशिम व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथ प्रशिक्षण व हॉर्टीकल्चर सेंटर, तळेगाव दाभाडे, पुणे येथे शेडनेट उभारणीचे प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. ग्रामस्वच्छता अभियानातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्लास्टिकमुक्त गावाकरिता प्रयत्न केले. सारडा यांच्या या कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाला होता.
त्या पुरस्काराचे वितरण ११ जुलैला मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यपाल विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सारडा यांच्या आईला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साडी भेट देण्यात आली. कार्यक्रमास सदाभाऊ खोत, सुभाष देसाई, कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर, शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.