...तिला बाळाला अखेरचे पाजताही आले नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 11:04 AM2020-09-26T11:04:56+5:302020-09-26T11:08:16+5:30
सर्पदंश झालेला असल्याने इच्छा असूनही ती माता आपल्या बाळाची भूक शमवू शकली नाही.
देपूळ : येथील एका महिलेस विषारी सापाने दंश केला. उपचारासाठी तिला रूग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी तिने आपल्या तीन महिन्याच्या चिमुकलीस सोबत घेतले. ती निरागस भुकेजलेली चिमुकली दुध पिण्यासाठी कासाविस झाली; परंतु सर्पदंश झालेला असल्याने इच्छा असूनही ती माता आपल्या बाळाची भूक शमवू शकली नाही, हा हृदय हेलावणारा प्रसंग वाशिम तालुक्यातील देपूळच्या ग्रामस्थांनी गुरुवारी अनुभवला. त्यामुळे सर्वांचे डोळे पाणावले होेते.
देपूळ येथील रामेश्वर महादेव गंगावणे यांची २५ वर्षीय पत्नी जयश्री रामेश्वर गंगावणे ही गुरुवार २४ सप्टेंबर रोजी दुपारी घरासमोरच्या ओट्यावर बसली असता दुपारी २.४५ मिनिटांनी ओट्यात असलेल्या बिळातून एक विषारी साप बाहेर आला आणि त्याने जयश्री गंगावणे हिला दंश केला. त्यामुळे ती किंचाळली. ग्रामस्थांनी धाव घेत उपचारासाठी तिला रुग्णालयात हलविले. जयश्रीला ३ महिन्यांची एक चिमुकली असल्याने तिने त्या चिमुकलीसही सोबत घेतले. त्यावेळी चिमुकली भुकेने व्याकूळ झाली होती. चिमुकलीची भूक पाहून जयश्रीचा पान्हाही दाटून आला आणि चिमुकलीही दुध पिण्यासाठी कासाविस झाली; परंतु आपल्या शरीरात सापाचे विष भीनले आहे. बाळाला दूध पाजल्यास त्याच्या जिवालाही धोका होईल. आपला जीव जात असताना बाळाला काही होऊ नये म्हणून तिने कठोर काळजाने चिमुकलीच्या भुकेकडे दुर्लक्ष केले आणि इच्छा असतानाही मुलीला दुध पाजले नाही. तिच्या आणि चिमुकलीच्या व्यथेचा हृदय हेलावून टाकणारा हा प्रसंग देपूळकरांनी पाहिला. त्यामुळे त्या सर्वांचे डोळेही पाणावले. अवघ्या काही मिनिटांतच जयश्रीचा मृत्यू झाला आणि सर्पदंशाने एका तीन महिन्यांच्या चिमुकलीचे मातृछत्र हिरावून घेतले.