पतीला सोडून ती निघाली प्रियकराशी ‘शुभमंगल’ करायला!
By admin | Published: May 19, 2017 01:02 AM2017-05-19T01:02:18+5:302017-05-19T01:02:18+5:30
प्रकरण पोहचले पोलीस ठाण्यात : लग्नाच्या २६ दिवसांतच फारकती
अरविंद गाभणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव(जि. वाशिम): कौटुंबिक दबावापुढे झुकून वडप येथील युवतीचा विवाह २१ एप्रिल २०१७ रोजी खडकी येथील एका युवकाशी झाला; मात्र लग्नाच्या अवघ्या २६ दिवसांतच तीने पतीला फारकती देवून प्रियकराशी ‘शुभमंगल’ करण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण मालेगावच्या पोलीस ठाण्यात १७ मे ला दाखल झाले असून, दोघांचे लग्न लावून देत प्रकरण निकाली काढण्याच्या निर्णयाप्रत दोन्ही कुटूंबांमध्ये विचारविमर्श सुरू असल्याची माहिती आहे.
लग्नाच्या काहीच दिवसांत तिचा प्रियकर तिला भेटायला गेला. याची माहिती नवविवाहितेच्या पतीला मिळाली. त्यामुळे त्याने १५ मे २०१७ रोजी पत्नीला फारकती दिली. त्यामुळे ती माहेरी परतली; पण ज्या मुलीच्या लग्नासाठी दिवसरात्र परिश्रम घेतले, नातेवाईकांची मनधरणी केली अन् तीच्यासाठी साजेशे स्थळ शोधून आणले, तीथेच आपल्या मुलीने आपली मान खाली घातली. त्यामुळे रागाच्या भरात तिच्या वडिलांनी तीला मारहाण केली. त्यामुळे सदर युवती १६ मे रोजी रागाच्या भरात बाहेरगावी गेली.
दरम्यान, १८ मे रोजी सकाळी १० वाजता प्रियकरासोबत तीने मालेगाव पोलिस ठाणे गाठून त्याठिकाणी आम्ही दोघेही सज्ञान असल्याने आम्हाला लग्न करायचे, अशी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांच्याही कुटूंबियांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणावर पोलिस ठाण्यात चर्चा सुरू होती. विशेष बाब म्हणजे या चर्चेत जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनीही हजेरी लावली. अखेर प्रियकर आणि प्रेयसी या दोघांच्याही सहमतीने त्यांचे ‘लव्ह मॅरेज’ लावून देण्याचा निर्णय झाला आणि या प्रकरणावर बहुतांशी तोडगा निघाला.