शेलूबाजार ग्रामपंचायतची महिनाभरात ५.६८ लाख वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:31 AM2021-01-10T04:31:29+5:302021-01-10T04:31:29+5:30
मंगरूळपीर तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या शेलूबाजार ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी ग्रामपंचायतच्या कर वसुलीस अत्यंत कमी प्रतिसाद लाभत ...
मंगरूळपीर तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या शेलूबाजार ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी ग्रामपंचायतच्या कर वसुलीस अत्यंत कमी प्रतिसाद लाभत होता. अनेकांकडे २० वर्षांपासूनचा कर थकीत राहिला होता. वारंवार मागणी करूनही कराचा भरणा करण्यास थकबाकीदारांकडून टाळाटाळ केली जात होती. तथापि, ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच कर वसुलीला वेग आला. निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांना कराचा भरणा करणे अनिवार्य असल्याने डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच ग्रामपंचायतीच्या कर वसुलीस वेग आला. इच्छुक उमेदवार स्वत:हून ग्रामपंचायकडे कराचा भरणा करण्यासाठी येऊ लागले. यात मालमत्ताधारकांकडून घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर करांच्या वसुलीपोटी ३० डिसेंबरपर्यंत ५ लाख ६८ हजार ४०२ रुपये ग्रामपंचायतीच्या तिजोरीत रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे येत्या मार्चपर्यंत वसुलीचे उद्दिष्टपूर्ण पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आह़े
-------
पाच वर्षांत प्रथमच मालमत्ताधारकांचा प्रतिसाद
ग्रामपंचायत अंतर्गत मालमत्ताधारकांकडून घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर करांची वसुली करण्यात येते. त्यात यंदा मोठ्या प्रमाणात कर थकीत असल्याने ग्रामपंचायतचे कर्मचारी कर वसुली करण्यासाठी वारंवार घरोघरी फिरून मालमत्ताधारकांना सूचना देत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नव्हते. तथापि, ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर होताच अनेक इच्छुक उमेदवारांनी ५ वर्षांपूर्वीचा थकीत कर भरला. त्यामुळे पाच वर्षांच्या काळात प्रथमच एका महिन्यात ५ लाखांच्यावर वसुली होऊ शकली.