अखेर शिरपूर आरोग्य केंद्र नवीन इमारतीत स्थलांतरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 04:04 PM2019-09-30T16:04:55+5:302019-09-30T16:05:27+5:30
शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ३० सप्टेंबरपासून नवीन इमारतीत स्थलांतरीत झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर अखेर शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ३० सप्टेंबरपासून नवीन इमारतीत स्थलांतरीत झाले आहे. यामुळे रूग्णांसह वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांची गैरसोय टळली आहे.
शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी यापूर्वी अतिशय तुकडी इमारत होती. त्या इमारतीमध्ये शौचालय, वॉशरूम अशा कुठल्याही व्यवस्था नसल्याने रुग्णांसह वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची प्रचंड हेळसांड होत होती. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी येणाºया महिलांना उघड्यावर शौचास जावे लागत होते. आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी निधीची मागणी झाल्याने शेवटी शासनस्तरावरून तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊनही चार ते पाच महिन्यांपासून लोकार्पण रखडले होते. ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले होते. शेवटी याची दखल घेतली असून, ३० सप्टेंबरपासून नवीन इमारतीत आरोग्य केंद्र अर्थात आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू झाले आहे. नवीन इमारतीत ३२ खोल्या असून, यामध्ये बैठक कक्ष, शस्त्रक्रिया कक्ष, प्रसूतिगृह, औषधालय, स्वतंत्र प्रतिक्षालयाची सुविधा आदींचा समावेश आहे.