शिरपूरची कोरोनामुक्तीकडे वाटचाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:27 AM2021-06-10T04:27:55+5:302021-06-10T04:27:55+5:30
कोरोनाचा पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत देशभरात प्रचंड प्रमाणात रुग्णसंख्या वाढून जीवितहानी ही मोठ्या प्रमाणात झाली. यामध्ये ग्रामीण भागही सुटला ...
कोरोनाचा पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत देशभरात प्रचंड प्रमाणात रुग्णसंख्या वाढून जीवितहानी ही मोठ्या प्रमाणात झाली. यामध्ये ग्रामीण भागही सुटला नाही. जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिरपूरातही एप्रिल, मे महिन्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. गावातील कमी वयाचे पाच ते सहा जण कोरोनामुळे एप्रिल-मे महिन्यात मृत्युमुखी पडले. मोठ्या प्रमाणात खर्च करूनही काही जीव वाचविता आले नाहीत. या काळात आरोग्य विभागाकडून गावात रुग्णसंख्या वाढू नये, म्हणून कोरोना टेस्ट व लसीकरणावर भर देण्यात येत होता. मेच्या शेवटी व जूनचा पहिल्या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. ४ जूनपर्यंत प्राप्त अहवालापैकी एक दोन कोविड सेंटरमधील ॲक्टिव्ह रुग्ण वगळता, गावात एक ही रुग्ण नसल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. ६ व ७ जूनचा केलेल्या कोरोना तपासणीचे अहवाल येणे बाकी आहे. एकंदरीत शिरपूर गावची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. कोरोनाचे संकट अद्यापही पूर्णपणे संपले नसून, जिल्हाधिकारी यांनी निर्देशित केलेल्या नियमांचे पालन सर्व नागरिकांनी करावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर मानवाने, डॉ.प्रणिता काकड, ग्रामविकास अधिकारी भागवत भुरकाडे व पोलीस निरीक्षक सुनील वानखडे यांनी केले आहे. पोलीस ट्रिपल सीट व विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. गाव कोरोनामुक्त व्हावे, यासाठी आरोग्य विभागाचा कर्मचाऱ्यांसह, आशा, अंगणवाडीसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठे योगदान दिले आहे.