जमिनीअभावी रखडला शिरपूरचा सौर प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 04:27 PM2020-09-29T16:27:58+5:302020-09-29T16:28:05+5:30
अद्याप ही जागा मिळाली नसल्याने प्रस्तावित प्रकल्पाचे काम रखडले आहे.
ग्रामपंचायतकडे जागेची मागणी : महावितरणने दिले पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : वारंवार खंडीत होणाºया वीजपुरवठ्याच्या समस्येतून शेतकºयांची सुटका करण्यासाठी महावितरणने मुख्यमंत्री सौरवाहिनी योजनेंतर्गत सौर उर्जा प्रकल्प उभारणीची तयारी केली आहे. या प्रकल्पासाठी ग्रामपंचायतकडे साधारण १ हेक्टर ई-क्लास जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही केली आहे. तथापि, अद्याप ही जागा मिळाली नसल्याने प्रस्तावित प्रकल्पाचे काम रखडले आहे.
रब्बी हंगामात शेतकºयांना वीज पुरवठ्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावते. विजेचा तूटवडा असल्याने ऐन हंगामाच्या दिवसांत शेतकºयांना भारनियमनाच्या संकटाचा सामना करावा लागतो. भारनियमनाच्या काळात आठवड्यात तीन ते चार दिवस रात्री सिंचनासाठी वीज पुरवठा केला जातो. हा प्रकार शेतकºयांसाठी त्रासदायक व धोकादायक ठरतो. त्यातही विज पुरवठा सुरू होताच त्यात बिघाड होण्याच्या घटना नेहमी घडतात. या समस्येवर पर्याय म्हणून शासन शेतकºयांच्या हितासाठी सौर प्रकल्प निर्मितीसाठी पुढाकार घेत आहे. या अंतर्गत ०.५ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीकरीता प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी १ हेक्टर, तर १.०० मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीसाठी २ हेक्टर जमीन आवश्यक आहे. शिरपूर येथील शेती व शेतकरी संख्या लक्षात घेता येथे १ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची गरज आहे. महावितरणने तसा आराखडाही तयार केला आहे. आता या प्रकल्पासाठी २ हेक्टर जमीन उपलब्ध करणे आवश्यक आहे. शिरपूर येथे शेकडो हेक्टर ई क्लास जमीन आहे. काही जमिनीवर अतिक्रमणही करण्यात आले आहे. ग्राम पंचायत प्रशासनाने सौर प्रकल्प निर्मितीसाठी जमीन दिल्यास शिरपूर येथील शेतकºयांची भारनियमनाच्या समस्येतून सुटका होणार आहे. तथापि, अद्याप ही जागा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे.