१५ दिवसांपासुन शिरपूर येथील पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:43 AM2021-07-28T04:43:46+5:302021-07-28T04:43:46+5:30
२०१२ पूर्वी गावात नादुरुस्त नळयोजनामुळे मोठी पाणीटंचाई होती. गावकऱ्यांना विशेषतः महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. हे ...
२०१२ पूर्वी गावात नादुरुस्त नळयोजनामुळे मोठी पाणीटंचाई होती. गावकऱ्यांना विशेषतः महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. हे लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य ईमदाद बागवान यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत ४.८९ मंजूर करून घेतले. मात्र या योजनेचे काम नियमानुसार करण्यात आले नाही. पाईपलाईन जमिनीमध्ये योग्य त्या खोलीवर टाकण्यात आली नाही. परिणामी पाईपलाईन वारंवार लिकेज होत आहे. बागवान यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे कागदपत्रांसह तक्रारीसुध्दा केल्या. अधिकाऱ्यांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले. यावर बागवान यांनी लोक न्यायालयात प्रकरण नेले. परंतु अपेक्षित न्याय मिळू शकला नाही. परिणामी शिरपूर ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन वारंवार नादुरुस्त होत आहे. मागील पंधरा दिवसांपासून गावातील पाणीपुरवठा बंद आहे. लिकेज झालेली पाईपलाईन दुरुस्ती करून गावातील पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
शिरपूर ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन प्रकल्पानजीकच एका मोठ्या नाल्यात नादुरुस्त झाली आहे. नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने मोठे प्रयत्न करूनही पाईप लाईन दुरुस्ती करणे शक्य झाले नाही. या विषयी ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरू आहेत.
- भागवत भुरकाडे़, ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत शिरपूर
राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम हे नियमानुसार न झाल्याने पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन कुठे ना कुठे सतत नादुरुस्त होत आहे. यामुळे गावकऱ्यांना सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकत नाही. याला वरिष्ठ स्तरावरील अधिकारी जबाबदार आहेत.
- ईमदाद बागवान, माजी जिल्हा परिषद सदस्य, शिरपूर जैन.